

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहा (बातमीदार): वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट रोहा व द युनिक ॲकडमी, पुणे संचलित सुनिल द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी रोहा यांच्या वतीने यूपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मार्गदर्शक दिनेश ताठे यांनी पदवी काळात तयारी कशी करावी तसेच दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य शासनाच्या सरळसेवा परीक्षांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. पुढील सत्र १२ एप्रिल रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------
सहज फाउंडेशनतर्फे सामुदायिक विवाह सोहळा
खालापूर (बातमीदार) : आर्थिक परिस्थितीमुळे लग्नासाठी कर्जबाजारी होणाऱ्या वधूपित्यांना दिलासा देण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपोली येथे आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २०२१ पासून संस्था हा उपक्रम राबवत असून, कर्जाचा भार टाळण्यासाठी सामुदायिक विवाह हा प्रभावी पर्याय असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी सांगितले. या सोहळ्यात सहभागी वधू-वरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. कार्यक्रमास सुधाकर घारे, पंकज पाटील, खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------
पेणमध्ये ईव्ही चार्जिंगची सुविध
पेण (वार्ताहर) : पेण येथील चिल्ड्रन्स फ्युचर ऑफ इंडिया आणि लेविकॉन इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ईव्ही कार चार्जिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी नगरसेवक राजा म्हात्रे, दिलीप लाड, उद्योजक सचिन शिगवण व कुणाल नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी सीएफआय संस्थेचे मुख्य अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांनी सांगितले की, शहरात प्रथमच सुरू झालेल्या या ईव्ही चार्जिंग सेंटरमुळे कमी वेळेत व कमी दरात वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा लाभ प्रवासी, वाहनचालक तसेच पर्यटकांना होणार असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. लेविकॉन इंडिया सिस्टीमचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर केदार नाडगौंडी यांनी सांगितले की, लेविकॉन ॲप व क्यूआर कोडद्वारे सहज पेमेंट करता येणार असून लवकरच बाईक चार्जिंगची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.