बेकरी व्यवसाय दुहेरी संकटात

बेकरी व्यवसाय दुहेरी संकटात
Published on

वाशी, ता. ५ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद आता थेट नवी मुंबईतील बेकरी व्यवसायावर उमटू लागले आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले आहेत. परिणामी पाव, बन, ब्रेडसारख्या दैनंदिन वापरातील पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा ग्राहकांवर आर्थिक ताण वाढत आहे.
काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक बेकरींमधील उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे. पूर्वी दररोज १५० ते २०० लादी पाव तयार करणाऱ्या बेकरींना आता केवळ १०० लादींपर्यंत उत्पादन मर्यादित ठेवावे लागत आहे. त्यामुळे बाजारात मागणी असतानाही पुरवठा कमी पडत असल्याचे चित्र आहे. याचवेळी मैदा, साखर, बटर, खाद्यतेल आणि इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. साखरेच्या ५० किलो पोत्यामागे १०० रुपयांची वाढ झाली असून, खाद्यतेलाच्या १५ किलो डब्याच्या किमतीत २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. गॅस आणि वीजदरवाढीमुळे उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. परिणामी, बेकरी व्यावसायिकांसमोर खर्चाचा ताळमेळ राखणे कठीण झाले आहे.
काही व्यावसायिकांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक भट्ट्यांचा वापर करण्याचा विचार सुरू केला असला, तरी त्यासाठी लागणारा मोठा भांडवली खर्च लहान व्यावसायिकांसाठी अडथळा ठरत आहे. कच्चा माल सतत महाग होत असल्याने दरवाढ अपरिहार्य झाली आहे; अन्यथा व्यवसाय टिकवणे कठीण होईल, असे मत घणसोलीतील बेकरी व्यावसायिकांनी व्यक्त केले. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी असली तरी वाढलेल्या खर्चामुळे कमी दरात विक्री करणे शक्य नसल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला असून, येत्या काळात पाव-ब्रेडसारख्या जीवनावश्यक पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरवाढ टाळण्याचा प्रयत्न
सध्या नवी मुंबईतील बेकरी व्यवसाय अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि कच्च्या मालाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत उत्पादन कमी करावे लागत आहे. ऑर्डर पूर्ण करण्यातही अडचणी येत आहेत. इलेक्ट्रिक भट्ट्यांचा पर्याय उपलब्ध असला तरी त्यासाठी लागणारा मोठा खर्च लहान व मध्यम व्यावसायिकांना परवडणारा नाही. सध्या ग्राहकांवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून दरवाढ टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास बेकरी उत्पादनांच्या किमती वाढविणे अपरिहार्य ठरणार आहे. सरकारने तातडीने गॅसपुरवठा सुरळीत करावा आणि व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नवी मुंबई बेकरी असोसिएशनचे प्रतिनिधी अखलेश कुमार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com