

कष्टकरी महिलांना गृहोपयोगी किटचे वाटप
शिवसह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : चिंचपाडा आणि नांदिवली परिसरातील कष्टकरी महिलांसाठी ''शिवसह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र''च्या वतीने शुक्रवारी गृहोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, तळागाळातील २०० हून अधिक महिलांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला.
शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे कल्याण विभाग अध्यक्ष सतीश पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ''महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा''कडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांतून चिंचपाडा परिसरातील घरकाम करणाऱ्या (धुणी-भांडी) आणि बांधकाम क्षेत्रातील महिला कामगारांना या सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या मदतीमुळे कष्टकरी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
किटमध्ये ३० वस्तूंचा समावेश
प्रत्येक गृहोपयोगी किटमध्ये दैनंदिन जीवनावश्यक अशा सुमारे ३० वस्तूंचा समावेश आहे. या साहित्यामुळे महिलांच्या घरगुती कामात मदत होऊन त्यांच्या संसाराला हातभार लागणार आहे. कष्टकरी महिला हा समाजाचा खरा कणा आहेत. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. महिलांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम व्यापक स्तरावर राबवले जातील, अशी प्रतिक्रिया शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पेडणेकर यांनी दिली.