‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना अडचणीत

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना अडचणीत
Published on

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या अर्थसंकल्प महासभेत ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजनेवरून उसळलेला वाद हा केवळ नावापुरता मर्यादित न राहता, थेट योजनेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरत आहे. सातवी ते बारावीतील गरजू मुलींसाठी महत्त्वाची ठरणारी ही योजना अद्याप आराखड्याशिवायच चर्चेत आली आणि त्यातच सावित्रीबाई फुले विरुद्ध ज्योती कलानी या नावाच्या राजकारणाने वातावरण तापले. परिणामी, विद्यार्थिनींसाठी अपेक्षित असलेली योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकून बारगळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या अर्थसंकल्पी सभेत भाजपकडून लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या योजनेला समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, याचवेळी महापौर अश्विनी निकम यांनी माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी यांच्या नावाने ही योजना सुरू करण्याची घोषणा केली. या दोन भिन्न भूमिकांमुळे सभागृहात जोरदार खडाजंगी झाली आणि विषय राजकीय रंगात रंगला. ही योजना शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुमारे दीड हजार विद्यार्थिनींना लाभदायी ठरणार होती. दरमहा आर्थिक मदत देण्याच्या या उपक्रमासाठी महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी ९ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आधीच सुमारे १५०० कोटींच्या थकबाकीचा सामना करणाऱ्या महापालिकेसाठी हा आर्थिक ताण मोठा ठरणार असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

श्रेयवादाचे राजकारण
विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी कशी करायची, निकष काय असणार, निधी उभारणी कशी होणार, याबाबत कोणताही ठोस आराखडा तयार करण्यात आलेला नाही. तरीदेखील केवळ नावाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगले. परिणामी, विद्यार्थिनींच्या हिताची योजना प्रत्यक्षात येण्याआधीच वादात अडकली आहे. एकमताच्या अभावामुळे तिचे भविष्य अनिश्चित बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com