धारावीतील माठ-मडके व्यवसाय अडचणीत!

धारावीतील माठ-मडके व्यवसाय अडचणीत!
Published on

धारावीतील माठ-मडके व्यवसाय अडचणीत!
माती, इंधन, रंग महागल्याने उत्पादन खर्च वाढला
संजय शिंदे : सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. ६ : मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. तापमानातील वाऱ्यामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे सर्वांचाच ओढा गार पाणी पिण्याकडे वाढला आहे. विशेषकरून माठातील पाणी अधिक गुणकारी समजले जात असल्याने त्यांची मागणी दरवर्षी वाढल्याचे चित्र धारावी येथील कुंभारवाड्यात पाहायला मिळत असते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात वाढलेल्या महागाईच्या भडक्याची झळ यावर्षीच्या मडका विक्रीस बसली आहे.
मडके, माठ आदी मातीच्या वस्तू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रकारची माती लागते. ती माती गुजरातमधून येते. मात्र, यंदा माती महाग झाली असून, ती वेळेवर येत नाही. मातीच्या वस्तू भट्टीत टाकून पक्क्या बनवल्या जातात. मात्र, केरोसीन व अन्य वस्तू मिळत नसल्याने मातीच्या वस्तू बनवणे कठीण झाल्याचे इथल्‍या कारागिरांनी सांगितले.
मडक्यावर तसेच अन्य मातीच्या भांड्यांवर कलाकुसर करून ठेवल्‍यास अशा वस्तूंची विक्री चांगली होत असते. मात्र, यंदा रंग, ब्रश आदी वस्तूही महाग झाल्याचे राकेश वाघेला यांनी सांगितले. महागामुळे मालाला उठाव नाही. यंदाच्या वर्षी ५० टक्के विक्री घटल्याचे मनीषा वाघेला या महिला विक्रेत्याने सांगितले. कोरोना काळात कारागिरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले होते. तशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
धारावीत जवळपास १,५०० कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. आधी विविध कारणांनी त्‍यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असताना त्यात इराणच्या युद्धाची भर पडली आहे. मातीपासून विविध वस्तू बनविणे व त्याची विक्री करण्याचे काम करणाच्या जवळपास ५०० ते ६०० कुटुंबांचे काम निम्म्यावर आले आहे; मात्र आता व्यवसाय कधी पूर्वपदावर येईल, याची काळजी त्‍यांना सतावत आहे. गोविंद चित्रोडा येथील एक रहिवासी असून, त्यांची चौथी पिढी मातीचे साहित्य करवून ते विक्री करतात. त्यावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत.
सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याने येथील माठ, मडके यांना यंदा मागणी वाढली नसल्याचे चित्रोडा यांनी सांगितले. कोरोनानंतर स्‍वतःच्या आरोग्‍याचा विचार करून अनेक जण माठातील पाणी पिण्यास प्राधान्य देत असल्याने मागणी वाढली होती, असे येथील विक्रेते महेश परमार यांनी सांगितले. होलसेल व किरकोळ खरेदीसाठी मातीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत माठ व मडके सध्या उपलब्ध आहेत.

आधुनिकतेची कास
धारावीतील कुंभारवाडा आधुनिकतेची कास धरत आहे. अनेक कुटुंबांनी परंपरागत पद्धतीने मातीचे साहित्य बनवण्यासोबतच यंत्राच्या सहाय्याने मातीचे साहित्य बनवणे सुरू केले आहे. यात तरुण पिढीने पुढाकार घेतला आहे. येथील कारागीर अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने मातीचे साहित्य बनवत आला आहे. परंपरागत पद्धतीचे काम वेळ खाऊ व मेहनतीचे होते. नवीन यंत्रामुळे वेळ वाचत आहे, तर मेहनतही कमी झाली आहे. कमी वेळेत जास्त काम होत असल्यामुळे कमाई वाढण्यास मदत होत आहे.

यंत्राच्या १०० भट्ट्या
कुंभारवाड्यातील काही कुटुंबांकडे मातीचे साहित्य बनवणारे यंत्र आहे. एका भट्टीत एका वेळेस जवळपास १५० माठ बनतात. अशा धारावी कुंभारवाड्यात १०० भट्ट्या आहेत. मुंबई, पालघर व ठाणे जिल्हा येथे धारावीत बनलेल्या माठांना अधिक मागणी आहे. लाल, काळे व पाढ्या रंगात माठ बनवले जातात, दोन लिटर ते २५ लिटरपर्यंतच्या माठांना सर्वाधिक मागणी असल्याचे गोविंद चित्रोडा यांनी सांगितले.

माठाचे फायदे
- माठातले पाणी प्यायल्याने टॉन्सिल्स, सर्दी यांसारख्या समस्या होण्याची शक्यता कमी.
- उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते.
- माठाच्या पाण्यामुळे खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात.
- माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते.
- माठाचे पाणी पिल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
- खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com