

श्रीराम कथा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम येथील जंगलेश्वर मंदिर सभागृहात रविवार (ता. ५) ते पुढील सोमवार (ता. १३) या कालावधीत नऊदिवसीय संगीतमय श्रीराम कथा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यात श्री श्री १००८ श्रीमद् जगद्गुरु हरी प्रपन्नाचार्य महाराज, राजराजेश्वरी शक्तीपीठाधीश्वर, प्रयागराज यांचे कृपापात्र शिष्य डॉ. श्रीनिवासाचार्य (मानस मनीषी) यांच्या श्रीमुखातून भगवान श्रीराम यांच्या जीवनचरित्राचे कथन सादर होत आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (ता. ५) दुपारी ४ वाजता श्री दुर्गा माता मंदिर, साकीनाका ते जंगलेश्वर महादेव मंदिर सभागृहापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेत परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
सविता रमेश सिंह यांच्या प्रमुख संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, निवेदक रितेश सिंह आणि हितेश सिंह यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडत असून, भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या श्रीराम कथा महोत्सवामुळे परिसरात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून, पुढील दिवसांतही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.