

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरी जाहीर
पालकांची आता यादीकडे नजर
मुंबई, ता. ६ : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या आरटीईच्या राखीव २५ टक्के प्रवेशांची लॉटरी आज (ता. ६) जाहीर झाली. यानंतर शाळानिहाय प्रवेशाची यादी लवकरच जाहीर केली जाणार असून, त्याची पालकांना प्रतीक्षा लागली आहे.
मुंबईतील खासगी व्यवस्थापनांच्या मुंबई शहरातील ७३ आणि उपनगरांतील २५२ अशा एकूण ३२५ खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी सहा हजार २३ जागा उपलब्ध आहेत. लॉटरीत यशस्वी झालेल्या मुलांच्या प्रवेशाची शाळानिहाय यादी लवकरच प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जारी केली जाणार आहे. या यादीनुसार प्रत्येक पालकाला त्याच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून प्रवेशाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पालकांना गुरुवारी (ता. ९) दुपारनंतर हे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहेत. ज्यांना हे एसएसएस मिळाले नाहीत त्यांना आरटीई प्रवेशासाठी केलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लॉगिनमध्ये जाऊन माहिती घेता येईल. यादीत नाव असलेल्या शाळांमध्ये जाण्यापूर्वी पालकांनी प्रवेशासाठी नेमण्यात आलेल्या तालुका, जिल्हा आणि विभागवार प्रवेश समित्यांकडे जाऊन आपली कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे. या समितीकडून अभिप्राय मिळाल्यानंतर तीच कागदपत्रे पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी शाळेमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी मुदत महत्त्वाची
आरटीई प्रवेशाच्या लॉटरीत ज्या मुलांचे प्रवेश निश्चित होतील त्यांच्या पालकांनी या प्रवेशासाठी देण्यात आलेल्या मुदतीतच संबंधित प्रवेश समित्या आणि शाळांमध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे अन्यथा मुदतीनंतर कोणतेही प्रवेश ग्राह्य धरले जाणार नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
अडवणूक करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई
आरटीई प्रवेश प्रक्रियेत मुलांचे प्रवेश निश्चित होऊनही त्यांना प्रवेश न देणाऱ्या शाळांच्या तक्रारी आल्यास त्यावर थेट शिक्षणाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. प्रवेश नाकारल्यानंतर प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्यास संबंधित शाळांवर संचालक कार्यालय स्तरावरून दंडात्मक आणि पुढे मान्यता रद्द करण्यापर्यंत कारवाईसाठी पावले उचलली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.