श्रीवर्धनमध्ये लोहारकाम व्यवसाय अडचणीत

श्रीवर्धनमध्ये लोहारकाम व्यवसाय अडचणीत
Published on

श्रीवर्धनमध्ये लोहारकाम व्यवसाय अडचणीत
वाढते खर्च आणि घटती मागणी यांचा दुहेरी फटका
श्रीवर्धन, ता. ६ (वार्ताहर) : तालुक्यातील पारंपरिक लोहारकाम करणाऱ्या कारागिरांचा व्यवसाय दिवसेंदिवस संकटात सापडत असून, अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे आता बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने स्थानिक लोहारांच्या कामावर परिणाम झाला आहे. तरीही श्रीवर्धनमध्ये काही मोजके कारागीर परंपरा जपत व्यवसाय सुरू ठेवत आहेत.
तालुक्यातील सुमारे २८ लोहार व्यावसायिकांचा उदरनिर्वाह पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहे. भट्टीत लोखंड तापवून ऐरणीवर हातोड्याच्या सहाय्याने विळे, कोयते, खुरपी, नांगराचे फाळ यांसारखी शेतीसाठी आवश्यक अवजारे तयार करण्याचे कौशल्य ते आजही जपून आहेत. मात्र, या कष्टसाध्य व्यवसायासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
दगडी कोळशाचा तुटवडा ही प्रमुख समस्या ठरत आहे. पर्याय म्हणून वापरला जाणारा लाकडी कोळसा महाग असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच कच्च्या लोखंडाचे वाढते दर आणि ग्राहकांची कमी होत चाललेली संख्या यामुळे नफा घटत आहे. नवीन पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवत शहरांकडे रोजगारासाठी वळण्याचा कल वाढल्याने पारंपरिक कौशल्य धोक्यात आले आहे.

कोळसा संकट वाढते
लोहारकामासाठी आवश्यक असलेला दगडी कोळसा पूर्वी सहज उपलब्ध होत होता. मात्र, सध्या त्याचा पुरवठा खंडित झाल्याने कारागिरांना लाकडी कोळशावर अवलंबून राहावे लागत आहे. लाकडी कोळशाचे दर प्रचंड वाढल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी, तयार वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागतात, ज्यामुळे ग्राहक कमी होण्याची भीती निर्माण होते. या संकटावर शासनाकडून कोणतीही ठोस मदत किंवा अनुदान न मिळाल्याने लोहार व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

प्रतिक्रिया .:-
लोहार कामासाठी आम्हाला बाजारात दगडी कोळसा उपलब्ध व्हावा. आज आम्ही आमचा पारंपरिक व्यवसाय सांभाळतोय. व्यवसायवाढीसाठी शासनाने आर्थिक पाठबळाची तरतूद करावी.
- उमेश लोहार, व्यावसायिक, श्रीवर्धन.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com