

ॲनिमल हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस
६० दिवसांत १५८ गुन्हे दाखल; भटक्या श्वानांचा हैदोस वाढला
ठाणे, ता. ६ : शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ॲनिमल हेल्पलाइन क्रमांकावर अवघ्या ६० दिवसांत १५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या श्वानांच्या उपद्रवाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे २६ लाखांच्या घरात असून, शहरात अंदाजे ५० ते ६० हजार भटके श्वान आहेत. पालिकेच्या अंदाजानुसार, दरमहा २५० ते ३०० पिल्लांची भर पडत आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, दुचाकींचा पाठलाग करणे आणि घोळक्याने हल्ले करणे अशा तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागावर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जात होती.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांत एकूण १५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. श्वानांचे हल्ले, निर्बीजीकरण (नसबंदी) आणि श्वान परवान्यासंदर्भातील चौकशी करण्यात आली आहे.
हेल्पलाइनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्वानांनी हल्ला केल्याच्या तक्रारी आहेत. तसेच श्वानांचे लायसन्स आणि नसबंदी प्रक्रियेबाबतही नागरिक माहिती घेत आहेत, अशी प्रतिक्रिया ठाणे पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली आहे.
निर्बीजीकरण मोहिमेला गती
भटक्या श्वानांच्या वाढत्या प्रजननावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने निर्बीजीकरण मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. पिसाळलेल्या किंवा हिंसक बनलेल्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा घटनांची माहिती तत्काळ हेल्पलाइनवर द्यावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.