

मोरबी जलवाहिनीत पाणीचोरीचा प्रकार उघड
पनवेल तालुक्यातील देवद-विचुंबे परिसरात अनधिकृत उपसा; नागरिकांमध्ये संताप
नेरूळ, ता. ६ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील देवद व विचुंबे ग्रामपंचायत हद्दीतून नवी मुंबई महापालिकेच्या मोरबी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अधिकृत परवानगी केवळ सुमारे १,८०० युनिटपर्यंत असताना प्रत्यक्षात दररोज सुमारे एक लाख युनिट पाणी उपसले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकारामुळे नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला असून, नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरूळ येथील नगरसेवक प्रदीप गवस यांनी याप्रकरणी आवाज उठवत कारवाईची मागणी केली आहे. मोरबे धरणाच्या जलवाहिनीतून अनधिकृत जोडण्या करून पाणी उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची दखल घेत महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, अनधिकृत जलवाहिन्या तोडण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. १५ मार्च रोजी सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच संबंधित पोलिस ठाण्याला याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.