

राज्यात उच्च रक्तदाबाचा वाढता धोका
३.८२ कोटींची तपासणी; ५७ लाखांहून अधिक रुग्ण
(७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिन)
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यात उच्च रक्तदाबाचा धोका वाढत असल्याचे चित्र समोर आले असून, मोठ्या प्रमाणावर नागरिक या आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे तपासणीतून दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२५पर्यंत तीन कोटी ८२ लाख ९३ हजार ६१८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीतून ५७ लाख ६१ हजार ८१० नागरिकांना उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. यापैकी ५७ लाख ४४ हजार ९३९ रुग्ण सध्या उपचाराखाली असून, राज्यातील आरोग्य यंत्रणा उपचारासाठी सक्रियपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.
मुंबईत आतापर्यंत अंदाजे १८ लाख व्यक्तींची उच्च रक्तदाबासाठीची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १७ हजार व्यक्तींना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले आहे व उपचाराधीन आहेत. उपचारानंतर रुग्णांनी नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याने फॉलो-अपवरही भर दिला जात आहे. त्यानुसार १० लाखांहून अधिक नागरिक फॉलो-अपमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात अजूनही आव्हाने कायम आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार सात लाखांहून अधिक नागरिकांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात आला आहे, जो एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहे. तज्ज्ञांच्या मते उच्च रक्तदाब असलेल्या पाचपैकी केवळ एका प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब नियंत्रणात असतो. त्यामुळे ८० टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अनियमित हृदय-ठोके आणि मूत्रपिंडाचे नुकसान यासह गुंतागुंत होण्याचा धोका असतो. जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब असलेल्यांपैकी अंदाजे ४६ टक्के लोकांना हे माहिती नसते की त्यांना उच्च रक्तदाब आहे. उच्च रक्तदाब असलेल्या सर्व प्रौढांपैकी अर्ध्यापेक्षा कमी लोकांचे निदान आणि उपचार केले जातात.
...
सायलेंट किलर
तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर असून तो हृदयविकार, स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे नियमित तपासणी, औषधांचे काटेकोर पालन तसेच आहार आणि जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्यक आहे.
...
सतत लक्ष ठेवा ः डॉ. सुपे
उच्च रक्तदाबासारख्या आजारांबाबत लोकांची जागरूकता पूर्वीपेक्षा वाढली असली तरी बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या आहार-सवयी यांकडे अजूनही पुरेसे लक्ष दिले जात नाही. जीवनशैलीत बदल करतानाच बीपी, ब्लड शुगरचे नियमित मॉनिटरिंग आणि वेअरेबल तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्यावर सतत लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.