

ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण शहापूरमध्ये
आकाश हे सदैव उघडे पुस्तक : दा. कृ. सोमण
शहापूर, ता. ६ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणीने सुसज्ज वेधशाळेचे उद्घाटन शहापूर तालुक्यातील पोकळ्याची वाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. ‘सॅपो’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खगोल केंद्राची उभारणी नीलेश ठाकूर, गिरीश ठाकूर आणि राज छेडा यांनी केली आहे.
या तारांगणाचे उद्घाटन खगोल अभ्यासक दा. कृ सोमण आणि स्थानिक आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते रविवारी (ता. ५) करण्यात आले. या वेळी डॉ. विजय महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने खगोलप्रेमी उपस्थित होते.
आमदार दौलत दरोडा म्हणाले, की ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण माझ्या मतदारसंघात उभे राहणे ही अभिमानाची बाब आहे. या प्रकल्पामुळे शहापूर खगोलप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे सांगत प्रकल्पासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी बोलताना दा. कृ. सोमण यांनी आकाशाचे महत्त्व अधोरेखित केले. आकाश हे एक उघडे पुस्तक आहे. ते अभ्यासण्यासाठी कोणताही खर्च लागत नाही आणि ते सदैव आपल्यासाठी खुले असते, असे सांगितले. त्यांनी पुढे शहापूर येथील हे केंद्र खगोल शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्याचे आवाहन केले. तसेच प्रौढांसाठी खगोलशास्त्राचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या केंद्राच्या माध्यमातून मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण होऊन भविष्यात शास्त्रज्ञ घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच तारांगणापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याची सुधारणा आणि रेल्वे स्थानकापासून बससेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी आमदारांकडे केली. दरमहा एक दिवस गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शो आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उद्घाटनानंतर उपस्थित खगोलप्रेमींना तारांगणात विशेष शो दाखविण्यात आला. वेधशाळेचे छप्पर उघडून अत्याधुनिक दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करण्यात आले. दा. कृ. सोमण यांनी लेझर पॉइंटरच्या सहाय्याने ध्रुवतारा, सप्तर्षी तसेच विविध ग्रह-तारकांचे दर्शन घडविले. यानंतर दुर्बिणीतून गुरू ग्रह आणि त्याच्या चार चंद्रांचेही निरीक्षण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाबद्दल उपस्थितांनी ठाकूर बंधूंचे कौतुक करून अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.