नवी मुंबईत महालक्ष्मी''चा जागर; 22 कोटींची ऐतिहासिक रेकॉर्डब्रेक उलाढाल

नवी मुंबईत महालक्ष्मी''चा जागर; 22 कोटींची ऐतिहासिक रेकॉर्डब्रेक उलाढाल
Published on

नवी मुंबईत ‘महालक्ष्मी’चा जागर
२२ कोटींची ऐतिहासिक उलाढाल
घरपोच सेवा, स्मार्ट सुविधांमुळे मुंबईकरांनी लुटला खरेदीचा आनंद

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुगंध, कष्टकरी माउलींच्या हातांची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालणाऱ्या महालक्ष्मी सरस-२०२६ या महोत्सवाची रविवारी (ता. ५) सांगता झाली. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १३ दिवस चाललेल्या या सोहळ्यात तब्बल २२ कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्रमी विक्री झाली असून, ग्रामीण महिलांनी उद्योजकतेचा नवा इतिहास नवी मुंबईच्या भूमीत लिहिला आहे.
२४ मार्चपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात ४९० स्टॉलवर मुंबई आणि नवी मुंबईकरांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. शेवटच्या सहा दिवसांत तर जनसागराचा महापूर लोटल्याने आयोजकांना प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला. हा प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळालेला एक भक्कम आधार ठरला आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे २५ किलोमीटरच्या परिघात दिलेली मोफत घरपोच सेवा. जड पिशव्यांचे ओझे वाहण्याची कटकट नसल्याने ग्राहकांनी गोणीभर धान्य, मसाले, सेंद्रिय गूळ आणि हस्तकलेच्या वस्तूंची मुक्तहस्ते खरेदी केली. या एका सुविधेमुळे उलाढालीचा आकडा थेट २२ कोटींच्या पार गेल्याचे सांगितले जात आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच नामवंत कलाकारांनी येथे हजेरी लावली. अनेक मान्यवरांनी महिला उद्योजिकांशी संवाद साधत व्होकल फॉर लोकलचा संदेश देणाऱ्या रील्स समाजमाध्यमांवर शेअर केल्या. परिणामी तरुण पिढीही मोठ्या संख्येने या प्रदर्शनाकडे आकर्षित झाली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून दिलेली क्लॉक रूम आणि विश्रांती कक्षाची सुविधा प्रदर्शनाचे संवेदनशील पाऊल ठरली. तंत्रज्ञान आणि परंपरेची ही सांगड पुढील काळात लखपती दीदीच्या मोहिमेला अधिक वेगवान करेल, असा विश्वास उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com