

बांधकाम स्थळांमुळे डासांचा वाढता कहर
प्रजनन स्थळांमध्ये ७५ टक्के वाढ; डेंगी-मलेरियाचा धोका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईसह महानगरांतील इमारत बांधकामांची ठिकाणे आता डेंगी व मलेरियाच्या डासांसाठी प्रमुख प्रजनन स्थळे ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांमध्ये तब्बल ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पालिकेच्या सर्वेक्षणात भायखळा, भांडुप, अंधेरी, मुलुंड आणि वांद्रे या भागांतील बांधकाम स्थळांवर सर्वाधिक प्रजनन स्थळे आढळली आहेत. सध्या मुंबईत सुमारे २,७८४ इमारतींचे बांधकाम सुरू असून, या ठिकाणी साचलेले पाणी व टाकाऊ साहित्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होत आहे.
आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये एकूण ३,५७९ प्रजनन स्थळे आढळली होती. यामध्ये मलेरियाचे २,८७१ आणि डेंगीचे ७०८ स्पॉट होते, तर २०२५ च्या सप्टेंबरपर्यंत हा आकडा वाढून ६,२६६ झाला असून, त्यात मलेरियाचे ४,४४५ आणि डेंगीचे १,८२१ स्पॉट नोंदवले गेले आहेत.
पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामांच्या ठिकाणांची नियमित तपासणी केली जात असून, संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांना डास नियंत्रणासाठी प्रशिक्षण दिले जाते. पावसाळ्यापूर्वी विशेष मोहीम राबवून कामगारांची तपासणी केली जाते. बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी आणि टाकाऊ साहित्य हे डास वाढीस कारणीभूत ठरत असून, ते हटविणे ही संबंधित बांधकाम कंपन्यांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास नोटीस तसेच काम थांबवण्याचे आदेशही दिले जातात.
महानगरात वाढत्या बांधकामांमुळे डास नियंत्रण ही मोठी आरोग्याची समस्या बनत असून, कठोर अंमलबजावणी आणि समन्वयाची गरज अधोरेखित होत आहे.
मनुष्यबळाची कमतरता
पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक वॉर्डमध्ये सरासरी ८० ते १०० बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. मात्र, कीटकनाशक विभागात ४०० ते ५०० पदे रिक्त असल्याने कामावर ताण वाढला आहे. या रिक्त पदांची भरती आणि स्पष्ट एसओपी तयार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संवेदनशील ठिकाणे
भायखळा : मलेरिया ७५४, डेंगी २८६
भांडुप : मलेरिया ४०२, डेंगी १९२
बोरिवली : मलेरिया ३११, डेंगी १३६
ग्रॅण्ट रोड : मलेरिया २७८, डेंगी ९५
वांद्रे (पश्चिम) : मलेरिया २६८, डेंगी ९६
टी वॉर्ड : मलेरिया २७६, डेंगी ९१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.