

ठाणे स्थानकात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ
पावणे दोन लाखांचे पाच फोन लंपास
ठाणे, ता. ७ : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दोन दिवसांत पाच वेगवेगळ्या प्रवाशांचे सुमारे एक लाख ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ६ एप्रिल या कालावधीत लोकल प्रवासादरम्यान या चोरीच्या घटना घडल्या. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातील महागडे फोन अतिशय सफाईदारपणे लंपास केले. यामध्ये प्राध्यापक, नोकरदार आणि तरुणांचा समावेश आहे. या चोरीच्या घटनांमध्ये विविध भागांतील प्रवाशांनी आपले महागडे फोन गमावले आहेत. यामध्ये चेंबूरचे रहिवासी अतुल रणपिसे यांचा ४७ हजार रुपयांचा, तर भांडुपचे मोहम्मद सरफराज आलम यांचा ३० हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याशिवाय कल्याण येथील विनोद चिटिमिल्ला यांचा ३५ हजारांचा, दिव्यातील श्याम सुभाष प्रजापती यांचा ४३ हजारांचा आणि कल्याणच्याच शंतनू संतोष कदम यांचा २५ हजार रुपये किमतीचा फोन चोरीला गेला आहे.
सर्व घटना गर्दीच्या वेळी प्रवासी डब्यात चढताना किंवा दरवाज्यात उभे असताना घडल्या आहेत. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.