लाच घेताना विक्रीकर अधिकारी जाळ्यात

लाच घेताना विक्रीकर अधिकारी जाळ्यात
Published on

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : जीएसटी विभागातील नोटीसच्या फाइलवर तोडगा काढण्यासाठी सात हजारांची लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रीकर अधिकारी आणि एका खासगी महिलेला सोमवारी (ता. ६) सायंकाळी रंगेहाथ पकडले. अमित भानुदास गिरी (वय ४५) आणि वैशाली वसंत कदम (वय ३९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमितच्या घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

तक्रारदाराचा सॉफ्टवेअर आणि वेबसाइट डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे. त्यांना जीएसटी विभागाकडून मिळालेल्या कारणे दाखवा नोटिशीवर व्यवसाय कर अधिकारी अमित गिरी यांची सही होती. यासंदर्भात चौकशीसाठी तक्रारदार कोकण भवन येथील जीएसटी कार्यालयात गेले असता, गिरी यांनी तक्रारदाराला त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या वैशाली कदम यांना भेटायला सांगितले.

कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कदम यांनी तक्रारदाराला एकूण २३,९०० रुपये भरण्यास सांगितले. यात १३,९०० रुपयांची अधिकृत पावती मिळेल. मात्र, उरलेले १० हजार रुपये फाइल बंद करण्यासाठी साहेबांना द्यावे लागतील, असे सांगितले. ही रक्कम लाचेची असल्याची खात्री पटताच तक्रारदाराने नवी मुंबई एसीबी कार्यालयात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, १० हजारांपैकी सात हजारांवर तडजोड झाल्यानंतर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोकण भवनमधील जीएसटी कार्यालयात सापळा लावला होता.

वैशाली कदम हिने नवीन नोंदणी करून देण्यासाठी आणखी दोन हजारांची जादा मागणी केली. तसेच गिरी यांच्या प्रोत्साहनानंतर ती रक्कम स्वीकारली. त्यानंतर व्यवसाय कर अधिकारी अमित गिरी यांनी मुख्य लाचेची सात हजार रुपये स्वतःच्या केबिनमध्ये स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने झडप घालून दोघांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ ताब्यात घेत त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम हस्तगत केली आहे. सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com