

काळू धरणवासीयांचा संघर्ष तीव्र
शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांचा जाहीर पाठिंबा
सरळगाव, ता. ७ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या काळू धरणाविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई आणि ठाणे शहराची तहान भागवण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या या धरणाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ज्येष्ठ शेतकरी नेते व कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी या लढ्याला जाहीर पाठिंबा देऊन धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे आश्वासन दिले आहे.
‘काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था’ व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मौजे खुटल (बा.) येथे ‘शेतकरी संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित शेतकरी आणि तरुणांना मार्गदर्शन करताना विश्वनाथ पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात मी काळू धरण परिसरातील प्रत्येक रहिवाशाच्या पाठीशी उभा आहे. या संघर्षात केवळ आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून साथ देईन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यामुळे काळू धरण परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धरणाच्या बांधावर जाऊन पाहणी
विश्वनाथ पाटील यांनी प्रस्तावित धरण क्षेत्रातील विविध गावांना भेटी देऊन जनसामान्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच प्रत्यक्ष धरणाच्या बांधावर जाऊन सद्यःस्थितीची माहिती घेतली. या वेळी ठाणे जिल्हा कुणबी सेनेचे अध्यक्ष कृष्णा भेरे, विलासकाका देशमुख, पोपटराव देशमुख, मंगल निमसे आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळू धरणविरोधी संघर्षासाठी सर्व बाधित शेतकरी आणि तरुणांनी संघटित होऊन लढा दिला पाहिजे. सरकारशी दोन हात करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
- विश्वनाथ पाटील, ज्येष्ठ शेतकरी नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.