

डोंबिवलीत ‘पुस्तक आदान-प्रदान’ आणि ग्रंथ प्रदर्शन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा विशेष जागर
डोंबिवली, ता. ७ : प्रसिद्ध ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘पुस्तकांचे देणे-घेणे’(आदान-प्रदान) आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत डोंबिवली (पूर्व) येथील सी. पी. गोयंका शाळेत हा उपक्रम पार पडणार असून, यंदा या प्रदर्शनाची मुख्य संकल्पना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ही आहे.
यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे पुस्तकांपासून तयार करण्यात येणारी अंदमानच्या ‘सेल्युलर जेल’ची प्रतिकृती. सावरकर नगरीत त्यांच्या साहित्याचे विशेष दालन असेल. २०१७ पासून सुरू असलेल्या या उपक्रमात वाचकांना आपल्याकडील जुनी पुस्तके देऊन त्या बदल्यात तितकीच दुसरी पुस्तके निवडण्याची संधी मिळणार आहे. तसेच नवीन पुस्तकेही सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. गुरुवारी, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त उपस्थित राहणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रदर्शनादरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक सौरभ वागळे यांची समीर गुधाते मुलाखत घेतील. एकलव्य आर्ट फोरम आणि श्रीमुद्रा कलानिकेतनतर्फे ‘अनादी मी अनंत मी’ हा सावरकर विचारधारेवर आधारित नृत्य कार्यक्रम सादर होईल. राज्य हौशी नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ‘दगडी भिंत’ या नाटकावर विशेष चर्चासत्र होईल. रविवारी १२ एप्रिलला पद्मश्री नारायण सुर्वे सभागृहात काव्य सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला असून, पुस्तकप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुंडलिक पै यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.