ग्रामीण भागातील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित

ग्रामीण भागातील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित
Published on

कामोठे, ता. ७ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीच्या मालकीचे डम्पिंग ग्राउंड नाही. पंचायत समितीने सिडकोला डम्पिंग ग्राउंडसाठी केलेली मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. सिडकोने नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाच्या मान्यतेकडे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.

पंचायत समितीच्या ७१ ग्रामपंचायती अंतर्गत १४६ गावांतून दैनंदिन सुमारे १५० ते २०० टन कचरा तयार होतो. सर्व ग्रामपंचायतीचे क्लस्टर करून समिती तयार करण्याचा पंचायत समितीचा विचार सुरू आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येत आहे. कुटुंब संख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. मात्र, पनवेल महापालिका आणि पंचायत समितीकडे स्वतःचे डम्पिंग ग्राउंड नसल्याने घनकचरा व्यवस्थापनाची समस्या बिकट झाली आहे.

अनेक ग्रामपंचायतीत निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यामध्ये जैव वैद्यकीय कचऱ्याचा समावेश होतो. रस्त्याकडेला, नदीपात्रात घनकचरा टाकला जात असल्याने नद्यांच्या प्रदूषण वाढत आहे. नेरे, कर्नाळा मार्गावर रस्त्याच्या कडेला कचरा जाळला जात असल्याने परिसरातील लोकांना घुराचा, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर स्त्याच्या दुतर्फा असलेल्या चायनीज गाड्या, हॉटेलमधून रस्त्यावर फेकण्यात येणारे अन्नपदार्थ खाण्यासाठी गर्दी करणाऱ्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे.

गव्हाण, न्हावे पारगाव व तरघर ग्रामपंचायतीने सिडको, तसेच शिरढोण व विचुंबे ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, तसेच चिखले व पळस्पे ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे मागणी केली आहे.

नगरविकास विभागाकडे प्रस्ताव
गायरान जमिनीवर डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या विचाराधीन होता. मात्र, त्याची अंमलबजावणी सहज शक्य नसल्याने पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी कोकण विभागीय आयुक्तांची मागील वर्षी भेट घेतली होती. त्यांनी तळोजा घोट गाव येथील सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडवर ग्रामपंचायतीचा कचरा टाकण्याची परवानगी मागितली होती. या अनुषंगाने सिडकोने मार्चमध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती सिडकोतील सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com