

उरण, ता. ७ (बातमीदार) : बुवाबाजी करणाऱ्या व त्यात सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह सर्व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (ता. ६) राज्यभर आंदोलन करण्यात आले. कामगार नेते भूषण पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र म्हात्रे, रवींद्र कासुकर, पद्माकर पाटील, कुंदा पाटील यांनी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन विविध मागण्या व राज्यव्यापी आंदोलनाबाबत त्यांना माहिती दिली.
राज्यात सध्या तंत्र-मंत्र, अंगारे-धुपारे करून अडचणीत सापडलेल्यांचे व महिलांचे शोषण करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशोक खरात यासारखेच राज्यातील गावागावात आणि शहरांमध्ये अनेक बुवा-बाबा तयार झाले आहेत. भोळ्या भाबड्या नागरिकांचे ते शोषण करत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व दोषींवर कारवाई होऊन हे प्रकार रोखण्यासाठी राज्यभर आंदोलन केले, असे कामगार नेते भूषण पाटील यांनी सांगितले. माकपच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या असून या प्रकरणाविरोधात निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलकांच्या मागण्या
अशोक खरात व त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कारवाई करा. खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी उपयोगात आणावी. या प्रकरणामध्ये ३९ आमदार सामील असल्याचे समोर येत असून ही नावे जाहीर करत त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावे. पीडित महिलांचे व्हिडिओ समाजमाध्यमांतून तातडीने हटवावेत. सरकारने राज्यातील सर्व भोंदूबाबांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अमलात आणावा. समाजमाध्यमांतून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणत, अशा जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.