

टिटवाळा स्थानकात प्रवाशांचा जीव मुठीत
टिटवाळा, ता. ७ (वार्ताहर) : टिटवाळा रेल्वे स्थानक सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करत असताना, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. स्थानकावर तीन पादचारी पूल असले, तरी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर येण्यासाठी असलेल्या अरुंद जिन्यांमुळे गर्दीच्या वेळी अनेकदा चेंगराचेंगरी होते. त्यातच मुख्य भागातील जिना दुरुस्तीसाठी बंद असल्याने सर्व भार एकाच लिफ्टवर येत आहे. यामुळे वृद्ध, महिला आणि बालकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. फलाट आणि गाडीतील मोठी ‘गॅप’ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनली आहे.
प्लॅटफॉर्म एक व दोनवर शौचालय नसल्याने महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे, अशी तक्रार ज्येष्ठ नागरिक विवेकानंद कानेटकर यांनी केली. फलाट तीनवरील शौचालयही सध्या बंद अवस्थेत आहे. कसारा दिशेकडील सुमारे तीन डब्यांपर्यंत पत्रा शेड नसल्याने उन्हाळ्यात आणि पावसात प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागते. पिण्याच्या पाण्याची मशीन बंद असून १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक फलाट विस्ताराचे कामही तांत्रिक कारणास्तव रखडले आहे.
स्थानक परिसराचीही दुरवस्था
केवळ रेल्वे स्थानकच नव्हे, तर पूर्वेकडील रिक्षा स्टँड परिसराचीही अवस्था बिकट आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारांची झाकणे तुटली असून उघड्या सळ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना अंधारातून वाट काढावी लागते. मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल अॅड. जितेंद्र जोशी यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाविरुद्ध संताप
टिटवाळा स्थानकाचा समावेश अमृत भारत योजनेत झाला असला, तरी प्रत्यक्षात आवश्यक कामांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. रेल्वेने तातडीने उपाययोजना न केल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा मध्य रेल्वे डीआरयूसीसी सदस्य श्याम उबाळे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.