

वज्रेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यात डुबी मारून रेती काढणाऱ्या पारंपरिक व्यवसायावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. स्थानिक आगरी, कोळी व आदिवासी समाजातील हजारो कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. रेती उत्पादनावरील वाढीव रॉयल्टी तत्काळ माफ करून या व्यवसायाला नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भिवंडी तालुक्यातील खारगाव, केवणीदिवे, काल्हेर-माणकोली, अंजुर, अलीमघर, डुंगे, वडघर, वडूनवघर, वेहेळे, पिंपळास, भरोडी, सुरई, कशेळी आदी गावांतील भूमिपुत्र खाडी व नदीपात्रातून डुबी मारून रेती काढण्याचा व्यवसाय करतात. खारबाव-कशेळी, कल्याण खाडी, कामवारी नदी तसेच गायमुख-नागला परिसरातील खाड्यांमध्ये हे काम मोठ्या प्रमाणावर केले जात असे. या पारंपरिक पद्धतीत होडका किंवा मचव्याच्या साह्याने पाण्यात डुबी मारून रेती काढली जाते. काढलेली रेती मचव्यामध्ये साठवून भरती-ओहोटीच्या वेळेनुसार तिची वाहतूक नदीकाठ किंवा खाडीकाठच्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांकडून या रेतीची खरेदी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत मजूर, खलाशी, रेती व्यावसायिक व ट्रकचालक अशा विविध घटकांना रोजगार मिळत होता. या पारंपरिक रेती व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने रॉयल्टी माफ करावी; तसेच स्थानिकांना प्राधान्य देणारी धोरणे राबवावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांवर उपासमारीचे संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
व्यवसाय अडचणीत
पूर्वी ७०० ते ८०० पडाव या व्यवसायात कार्यरत होते. त्यामुळे किमान पाच ते सहा हजार कामगारांना थेट रोजगार उपलब्ध होता. मात्र, सरकारच्या जाचक अटी आणि रेती उत्पादनावरील वाढीव महसुलामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यातच गुजरात राज्यातील रेती उत्पादनाचे वाढते सावट स्थानिक व्यवसायावर परिणाम करत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
रेती वाहतूक व रेती काढणे यावर प्रशासनाकडून बंदी आहे. ठिकठिकाणी अनधिकृत रेती काढणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू आहे. कोणालाही नियमबाह्य काम करण्याची मुभा दिली जाणार नाही. काही जण उपासमारीचा मुद्दा पुढे करत असले तरी कायद्याचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे.
- अभिजित खोले, तहसीलदार, भिवंडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.