

रोहेकरांचे १४ एप्रिलला जेल भरो आंदोलन
रोहा, ता. ४ (बातमीदार) ः चणेरा-बिरवाडी-पांगळोली-उसरमार्गे रोहा या बहुचर्चित रस्त्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी मंजूर केला. दरम्यान, या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. याविरोधात आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी १४ एप्रिलला जेल भरो आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
रोहे शहरापासून चणेरा विभागाला अनेक गावे जोडली गेली आहेत. या महत्त्वाच्या ठिकाणी चणेरा-बिरवाडी-पांगळोली-उसरमार्गे रोहाच्या डांबरीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री, संबधित खात्याचे मंत्री आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रकाश विचारे यांनी या कामी पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यासाठी २०२३मध्ये पाच कोटींचा निधी मंजूर केला. १५ ऑक्टोबर २०२४ला रस्त्याच्या कामाची मुदत संपली. या दरम्यान रस्त्याचे काम न झाल्याने प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागच्या उप अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले. परंतु अद्याप या रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुस्त प्रशासनाविरोधात १४ एप्रिलला चणेरा नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करणार असून, ग्रामस्थ स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून जेल भरो आंदोलन करणार आहेत. आमच्याबरोबर खोटे आश्वासन देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनादेखील अटक करा, अशी मागणी आंदोलकांमार्फत केली जाणार असल्याची माहिती प्रकाश विचारे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.