

धारावीकरांचे सरासरी आयुष्य मुंबईकरांपेक्षा कमी!
मूलभूत सुविधांच्या अभावाने स्थानिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम
धारावी, ता. ७ (बातमीदार) : धारावीतील माणसाचे आयुष्य हे ६० वर्षांपेक्षा कमी असल्याचे फारच गंभीर वास्तव नोंदवले गेले आहे. मुंबई आणि देशाच्या सरासरी आयुष्यापेक्षा (६७ वर्षे) हे खूपच कमी असल्याचे समोर आले आहे. काही अति प्रदूषित भागांमध्ये ही सरासरी खूपच कमी असून, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही फारच गंभीर बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जगभरात अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान, नवनवीन उपचार पद्धती आणि दर्जेदार आरोग्य सुविधा या विषयांवर सकारात्मक चर्चा केल्या जात आहेत. मात्र आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आजही आरोग्य म्हटले की दूषित पाणी, अस्वच्छता, प्रदूषित हवा आणि कोंदट घरे याच मूलभूत विषयांवर बोलले जाते. दुर्दैवाने आजही याच घटकांवर इथले सार्वजनिक आरोग्य अवलंबून आहे. स्थानिक डॉक्टरांच्या मते, धारावीतील लोकांचे सरासरी आयुष्य कमी असण्यामागे कोणताही गंभीर आजार नसून, धारावीकर ज्या वातावरणात राहतात त्याचा एकत्रित परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला दिसून येतो.
धारावीसारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या कमी आयुष्याचे कारण एखादा आजार नाही, तर प्रदूषित हवा, स्वच्छतेचा अभाव, अशुद्ध पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सततचा ताण यांचा एकत्रित परिणाम इथल्या रहिवाशांच्या आरोग्यावर होतो. बऱ्याच कालावधीसाठी हीच परिस्थिती राहिल्यास त्यातून आयुष्य नक्कीच घटते, अशा शब्दांत रेश्मा नर्सिंग होमचे संचालक डॉ. फुरकान शेख यांनी सांगितले. धारावीत पाचपैकी दोन घरांमध्ये संसर्गजन्य आजार सर्रास दिसून येतात. क्षयरोग, संसर्गजन्य रोग आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार येथे नवे नाहीत. कमी वयातच अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दीर्घकालीन श्वसनविकारांचा सामना करावा लागतो. या सगळ्याचे मूळ इथल्या लोकांच्या राहणीमानात आहे, असेही डॉ. शेख यांनी स्पष्ट केले आहे.
------------
अपुरे आणि अशुद्ध पाणी, प्रदूषित हवा आणि दाटीवाटीच्या वस्तीचा कोंडमारा हा आमच्या रोजच्या संघर्षाचा भाग झाला आहे. आमच्यातील बहुतांशी लोक सतत आजारी पडतात आणि त्यासाठी आजूबाजूचा परिसर जबाबदार असल्याचे निदान डॉक्टरांकडून करण्यात येते, ही बाब आमच्यासाठी काही नवीन नाही.
- दुर्गा जाधव, स्थानिक रहिवासी
--------
इथे दिवसेंदिवस श्वास घेणेदेखील जिकिरीचे होत चालले आहे. माझ्या शेजाऱ्यांना सतत खोकला असतो. आम्ही ज्या प्रदूषित वातावरणात राहत आहे तिथे निरोगी राहण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो.
- संध्या डोईफोडे, स्थानिक रहिवासी
---------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.