मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे सिमलेस जाळे

मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे सिमलेस जाळे
Published on

मेट्रोचे सीमलेस जाळे उभारणीच्या मार्गावर
मिरा-भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

भाईंदर, ता. ७ : मिरा-भाईंदर मेट्रोच्या दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी दहिसर मेट्रो स्थानकावर हिरवा कंदील दाखवून मेट्रोला प्रारंभ केला आणि काशीगावपर्यंत प्रवासही केला. संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे सीमलेस जाळे उभारून एकसंध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू असून, येत्या तीन ते चार वर्षांत मुंबईत दिल्लीपेक्षाही मोठे मेट्रो जाळे उभे राहील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो
प्रकल्पामुळे मिरा-भाईंदरला मुंबईशी थेट जोडणी मिळाली असून, ठाणे जिल्ह्यातील ही पहिली मेट्रो सेवा ठरली आहे. सध्या देशात कार्यरत मेट्रो सेवांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून, १०० किमीहून अधिक जाळे पूर्ण झाले आहे.

प्रवासाचा वेळ निम्म्यावर
मेट्रोमुळे मिरा-भाईंदरहून अंधेरीपर्यंतचा एक ते दोन तासांचा प्रवास आता केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढे मेट्रो-७ आणि मेट्रो-३शी जोडणी झाल्यानंतर कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.

दुसरा टप्पा अंतिम टप्प्यात
काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या दुसऱ्या टप्प्याचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून, तोही टप्पा याच वर्षात सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ६,६०७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हरित आणि आधुनिक प्रकल्प
मेट्रोमध्ये कॅशलेस तिकीट प्रणाली, वन कार्डद्वारे व्यवहार, सौरऊर्जा, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, एलईडी दिवे आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांचा वापर करण्यात आला असून, हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगण्यात आले.

जलमार्ग, ई-बसचे जाळेही विस्तारणार
मेट्रोसोबतच ई-बस आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बसचे जाळेही उभारले जात असून, भविष्यात जलमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई देशातील सर्वात सुगम शहर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘लूप’ संकल्पनेवर भर - शिंदे
मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोद्वारे ‘लूप’ तयार करण्याचे काम सुरू असून, हे जाळे पूर्ण झाल्यानंतर मुंबई मेट्रो हा जगातील अद्वितीय प्रकल्प ठरेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. २०१८मध्ये भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पाला काही काळ अडथळे आले होते; मात्र २०२२ नंतर गती देऊन काम पुढे नेल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com