मतदार यादी पडताळणीस नकार डोंबिवलीतील 16 शिक्षकांविरुद्ध तक्रार

मतदार यादी पडताळणीस नकार
डोंबिवलीतील 16 शिक्षकांविरुद्ध तक्रार
Published on

मतदार यादी पडताळणीस नकार
डोंबिवलीतील १६ शिक्षकांविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ ः मतदार यादीच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील एका नामांकित शाळेतील १६ शिक्षकांविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांवरदेखील याप्रकरणी लवकरच तक्रार दाखल होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या दोन तक्रारींमध्ये १० शिक्षकांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांची पडताळणी सुरू असून, या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना ‘बीएलओ’ (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील एका नामांकित शाळेतील १६ शिक्षकांना ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी लेखी आदेश दिले होते; मात्र संबंधित शिक्षकांनी हे आदेश स्वीकारण्यास नकार दिला किंवा आदेश स्वीकारूनही प्रत्यक्ष कामात सहभागी झाले नाहीत, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
-------------
मुख्याध्यापकांविरोधात तक्रार
पडताळणीत सहभागी न झाल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवत, सहाय्यक नोंदणी अधिकारी म्हणून पवार यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रार केलेल्या शिक्षकांमध्ये १४ महिला व दोन पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांना कार्यमुक्त करत नव्हते, त्यामुळे त्यांच्याविरोधातदेखील लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
----------------
निर्णयाला विरोध
दरम्यान, शिक्षक व शैक्षणिक संस्थांकडून या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला आहे. सध्या दहावीच्या परीक्षा व उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू असल्याने शिक्षकांवर आधीच मोठा ताण आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वीच पालिका निवडणुकांशी संबंधित कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. वारंवार अशा कामांसाठी शिक्षकांना पाचारण केल्यास शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याची भूमिका संस्थाचालकांनी मांडली आहे. निवडणूक व जनगणनेसारख्या कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, तसेच बेरोजगार युवकांना संधी द्यावी, अशी मागणीही शिक्षण संस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com