आंतरजातीय विवाह केल्याने मुलाकडील कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार

आंतरजातीय विवाह केल्याने मुलाकडील कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार
Published on

आंतरजातीय विवाहामुळे
ठाण्यात सामाजिक बहिष्कार
कौटुंबिक किंवा व्यावसायिक सबंध ठेवण्यास प्रतिबंध

ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) ः ठाण्यात एका कुटुंबाला जात पंचायतीच्या कुप्रथेचा सामना करावा लागला आहे. जैन धर्मातील तरुण-तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या कुटुंबीयांवर चार महिन्यांपासून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलाचे कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आपल्याला कायद्याचे संरक्षण मिळावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील कुटुंबीयांनी केली आहे.
ठाण्यात राहणाऱ्या जैन कुटुंबातील सोहनलाल छबिलाल जैन यांच्या मुलाचा विवाह त्याच धर्मातील वेगळ्या पंथामधील तरुणीशी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झाला. लग्न झालेले तरुण -तरुणी एकाच धर्मातील असले तरी त्यांचे दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन असे पंथ आहेत. दोन्ही कुटुंबाने संमतीने मुला-मुलीचे लग्न केले. मुलीकडील पंथाच्या लोकांनी या लग्नाला विरोध दाखवत मुलाच्या कुटुंबीयांना चार महिन्यांपासून बहिष्कृत केले. सोहनलाल यांनी त्यांच्या मुलाचा विवाह दिगंबर समाजातच करावा, असा त्यांच्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. मात्र, तो पाळण्यात न आल्याने ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी सोहनलाल यांच्या मूळ गावी सभा बोलावून सोहनलाल त्यांच्या कुटुंबीयांवर जाहीरपणे सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा केली. सामाजिक मेळाव्यात तसेच समाजातील कोणत्याही व्यक्तीशी कौटुंबिक किंवा व्यावसायिक सबंध ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याप्रकरणी सोहनलाल जैन यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याचे वकील सागर कदम यांनी सांगितले.
---------------------
इतर कुटुंबीयांवर बहिष्कार
मुला-मुलीच्या लग्नामध्ये हजर असलेल्या इतर कुटुंबीयांवरदेखील बहिष्कार टाकत तो मागे घेण्याकरिता त्यांच्याकडून माफीनामे आणि ११ हजार रुपये घेतले असल्याचा आरोप सोहनलाल आणि त्यांचे वकील सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता. ७) केला आहे. समाजाच्या उद्धाराकरिता स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून हा बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे सोहनलाल जैन यांचे म्हणणे आहे.
----------------------
एखाद्या समाजावर बहिष्कार टाकणे हा २०१६ मध्ये पारित झालेल्या कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरवण्यात आला आहे. ठाण्यासारख्या प्रगत शहरात राहणाऱ्या प्रगत समाजाकडून बहिष्कार टाकण्याची घटना घडणे दुर्दैवी आहेच. मात्र, पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यास दिलेल्या कुटुंबाला कायद्याचे संरक्षण न देणे हा त्याहीपेक्षा दुर्दैवी घटना आहे. याविषयी गुन्हा दाखल झाला नाही, तर न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.
- सागर कदम, पीडिताचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com