उरणमध्ये मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण

उरणमध्ये मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण
Published on

उरण, ता. ७ (बातमीदार) : गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उरण तालुक्यातील १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी आरोग्य विभागाकडून ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (एचपीव्ही) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पात्र मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे.
एचपीव्ही हा संसर्गजन्य विषाणू आहे. तो गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. योग्य वयात लसीकरण केल्यास या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मोहिमेंतर्गत १४ वर्षे पूर्ण केलेल्या; तसेच १५ वर्षांच्या मुलींना लसीकरणाचा लाभ दिला जाणार आहे. बाजारात सुमारे ४,५०० रुपयांची असलेली ही लस सरकारकडून पूर्णत: मोफत उपलब्ध करून दिली आहे. लसीकरणासाठी येताना मुलीच्या वयाचा दाखला, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. तालुक्यातील सर्व पात्र मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com