

लोकमान्य-सावरकरनगरमधील आठवडा बाजार होणार बंद
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापौरांचे निर्देश
ठाणे, ता. ८ : लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता ठाणे महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. रस्त्यांवर अडथळा ठरणारा मंगळवारचा आठवडा बाजार बंद करण्यासोबतच, रस्ते व्यापून टाकणारी जुनी भंगार वाहने तात्काळ हटवण्याचे कडक निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले आहेत.
प्रभाग समितीअंतर्गत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत महापौरांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. छत्रपती संभाजी महाराज चौक, आर. जे. ठाकूर कॉलेज नाका आणि कामगार नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पार्किंगचे नवे नियोजन आणि अतिक्रमणांविरुद्ध मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, नगरसेविका कांचन चिंदरकर, शीतल ढमाले तसेच उपायुक्त उमेश बिरारी व दिनेश तायडे यांच्यासह विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
मंगळवारी भरणारा आठवडा बाजार रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तो तातडीने बंद करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे उभी असलेली, गंजलेली आणि नादुरुस्त वाहने अतिक्रमण विभागामार्फत जप्त केली जाणार आहेत. तसेच यशोधन नगर डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील गॅरेजवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.
पार्किंगचे नियोजन
वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिसरात ‘पी-१’ आणि ‘पी-२’ अशा पद्धतीने पार्किंगचे नियोजन केले जाणार आहे. तसेच शास्त्रीनगर नाका व हत्तीपूल येथे बससाठी दोन पार्किंग प्लॉट देण्याची सूचना सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी मांडली.
परिवहन बसमध्ये वाढ
इंदिरानगर ते रोड नंबर २२ आणि लोकमान्यनगर पाडा परिसरात टीएमटी बसेसची संख्या वाढवल्यास रिक्षांची गर्दी कमी होऊन कोंडी सुटेल, असे मत पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.