फेरीवाला हटाव कारवाईत पालिका कर्मचाऱ्याला धमकी

फेरीवाला हटाव कारवाईत पालिका कर्मचाऱ्याला धमकी
Published on

डोंबिवलीत फेरीवाल्याची मुजोरी
पालिकेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; जीवे मारण्याची धमकी

डोंबिवली, ता. ८ : रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेदरम्यान एका परप्रांतीय फेरीवाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल संबंधित फेरीवाल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री ही कारवाई सुरू असताना एका २५ वर्षीय फेरीवाल्याने थेट पालिकेच्या पर्यवेक्षकालाच लक्ष्य केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रेल्वे तिकीट खिडकीसमोरील मोकळ्या जागेत सानु रामभवन साह (वय २५) हा फेरीवाला मोबाईल कव्हर विक्री करत होता. यामुळे प्रवाशांना येण्या-जाण्यास मोठा अडथळा होत होता. केडीएमसीच्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत त्याचे साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न केला. या वेळी संतापलेल्या साह याने कंत्राटी पर्यवेक्षक धीरज भरत अंकरे (३१) यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. जप्त केलेले साहित्य सोडण्यासाठी त्याने कर्मचाऱ्यांवर दबाव आणला आणि मागणी धुडकावून लावल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली.

तीन टेम्पो भरून साहित्य जप्त
अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि प्रसाद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सोमवारी रात्री झालेल्या कारवाईत तब्बल तीन टेम्पो भरून फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. हे साहित्य पुन्हा फेरीवाल्यांच्या हाती लागू नये, म्हणून ते तातडीने कल्याण येथील भंगार केंद्रात विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आले आहे.

नागरी समाधान आणि सुरक्षेचा प्रश्न
फेरीवाला हटाव मोहिमेमुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर मोकळा श्वास घेत असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे; मात्र कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले पाहता, त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com