शेंगदाण्यासह खाद्यतेलाच्या भावात वाढ

शेंगदाण्यासह खाद्यतेलाच्या भावात वाढ
Published on

पनवेल, ता. ९ (बातमीदार) : गेल्या पाच ते सहा महिन्यांत शेंगदाण्यासह विविध खाद्यतेलांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. आखाती युद्धाचा परिणाम म्हणून पनवेल, नवी मुंबईमध्ये सध्या खाद्यतेलाचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. या महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना बसत आहे. शेंगदाणा तेलाचे दर प्रतिलिटर १७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे सूर्यफूल व पामतेलाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात रोज दरांमध्ये चढ-उतार होत असल्याने ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण आहे. दरवाढीमागे अनेक कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने आयात खर्च वाढला आहे. भारताचे मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबित्व असल्याने जागतिक बाजारातील बदलांचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर हेत आहे. याशिवाय वाहतूक खर्चात वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, साठेबाजी यामुळेही दरवाढीला चालना मिळत आहे. याचा परिणाम केवळ घरगुती वापरावरच नाही, तर हॉटेल व खाद्य व्यवसायावरही होत आहे. अनेक ठिकाणी पदार्थांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तेलाचा वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी तेलकट पदार्थाच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

ग्राह‌कांकडूनही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही कुटुंबांनी तेलाचा वापर कमी केला आहे. पर्यायी पदार्थांकडे वळण्याचा कल दिसत आहे. मात्र आवश्यक वस्तू असल्याने पूर्णपणे टाळणे शक्य नसल्याने आर्थिक ताण वाढत आहे. दरम्यान, पुढील काळात आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यास दर स्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या स्थितीत तरी खाद्यतेलाचे दर उच्चपातळीवरच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने यावर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अस्थिरतेचा परिणाम
गेल्या पाच ते सहा महिन्यांत शेंगदाण्यासह खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ ही केवळ स्थानिक नाही, तर जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेचा परिणाम आहे. पनवेल, नवी मुंबईसारख्या शहरांतही याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, महागाईचा दबाव वाढत आहे.

वाढीची मुख्य कारणे
- पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळित
- आयात खर्चात आठ ते २५ टक्के वाढ
- शेंगदाणा, तीळ यांसारख्या देशी तेलांचीही दरवाढ
- व्यापाऱ्यांकडून साठेबाजी व अनिश्चितता
- किरकोळ बाजारात दरात सतत चढ-उतार
- गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com