

शस्त्रसंधी, पण युद्धाची सावली कायम!
इराण-अमेरिका, इस्राईल युद्धाबाबत तज्ज्ञांचे मत
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : इराण-अमेरिका-इस्राईलमध्ये ४० दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर तोडगा निघाला आहे. दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव पाहता हे युद्ध खरोखरच संपुष्टात आले आहे की पुढे पुन्हा युद्धाचा भडका उडू शकतो, याबाबत अजूनही जगात साशंकता आहे. दरम्यान, इराणच्या प्रतिकाराकडे पाहता हा संघर्ष कायमस्वरूपी संपण्याची चिन्हे असल्याचे आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकारांचे मत आहे.
या युद्धामागे डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन प्रमुख उद्दिष्टे ठेवली होती. ती म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम नष्ट करणे, सत्ताबदल घडवून आणणे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवणे. दरम्यान, इराणच्या चिवट प्रतिकारामुळे ही उद्दिष्टे गाठण्यात ट्रम्प अपयशी ठरले. या युद्धाविरोधात अमेरिकेत जनक्षोभ वाढला आहे आणि ट्रम्प यांची लोकप्रियता वेगाने घटत आहे. त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली. ट्रम्प यांची समेटाची भाषा पाहता पुढे जाऊन हा संघर्ष कायमचा थांबेल, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राचे प्राध्यापक अमिताभ सिंह यांचे मत आहे.
युद्धखोरीची भाषा, इराणची प्राचीन सभ्यता नष्ट करण्याची दिलेली धमकी तसेच देशाला पाषाणयुगाकडे नेण्याची वल्गना करणाऱ्या ट्रम्प यांना अखेर युद्धबंदी करावी लागली. कारण इराणी जनतेने अत्यंत विनाश आणि विध्वंस सहन करूनही अमेरिका-इस्राईलचा मुकाबला केला, असे आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. इतके भीषण हल्ले केल्यानंतर पुढे काय करायचे, हा प्रश्न अमेरिका आणि इस्राईलसमोर निर्माण झाला होता. या युद्धातून एक गोष्ट स्पष्ट झाली की इराण संपलेला नाही आणि संपणारही नाही. त्यामुळे तात्पुरत्या युद्धविरामाला अद्याप अंतिम स्वरूप आले नसले, तरी गेल्या ४० दिवसांच्या संघर्षाची पुनरावृत्ती होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक व आंतरराष्ट्रीय धोरणतज्ज्ञ स्वर्ण सिंग यांच्या मते, जगात आजपर्यंत युद्धविराम जाहीर केल्यानंतर त्याचे उल्लंघन किंवा छोट्या-मोठ्या चकमकी पूर्णपणे थांबल्या, असे एकही उदाहरण नाही. गाझा युद्ध संपल्यानंतरही इस्राईलचे हल्ले पूर्णपणे थांबलेले नाहीत. युद्धविरामामुळे दोन्ही देशांमधील तणाव निश्चितच कमी झाला आहे. इस्लामाबादमध्ये प्रत्यक्ष चर्चा सुरू झाल्यानंतरच पुढील रोडमॅप स्पष्ट होईल. कारण हेजबुल्ला आणि इस्राईल यांची याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. या युद्धात इराणच्या जनतेने त्रास आणि दुःख सहन करण्याची मोठी क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतरच युद्धाची पुढील दिशा स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.