

कोपरच्या हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामे
पालिका प्रशासनाच्या ‘निवडक’ कारवाईवर संताप
डोंबिवली, ता. ९ : शहराचे फुप्फुस मानला जाणारा कोपर परिसरातील एकमेव हरितपट्टा आता बेकायदा बांधकामांनी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. ‘कोंबडीच्या खुराड्या’च्या नावाखाली सुरू झालेली ही बांधकामे आता अक्राळविक्राळ रूप धारण करत असतानाही, कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. टिटवाळा आणि कल्याणमध्ये कारवाईचा बडगा उगारणारे प्रशासन कोपरमधील बेकायदा चाळींवर मौन का बाळगून आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात मागील तीन वर्षांपासून बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. सध्या या ठिकाणी १०५ बाय १०० फुटांच्या विस्तीर्ण जागेवर नव्याने बांधकामे सुरू असून, विटा आणि बांधकामाचे साहित्य खुलेआम साठवले जात आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास
टिटवाळा आणि कल्याण पूर्व भागात बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवणाऱ्या आयुक्तांचे कोपर, म्हाळसाई चाळ, इंदिरा म्हात्रे चाळ आणि सरोवरनगर भागातील शेकडो बेकायदा चाळींकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा नागरिक करत आहेत. हरितपट्टा नष्ट झाल्यामुळे आणि खाडीपात्रातील वाढत्या हस्तक्षेपामुळे पावसाळ्यात वस्तीत पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले आहे.
उपोषण अस्त्र
प्रशासनाच्या या निष्क्रियतेविरोधात सामाजिक कार्यकर्ते विनोद जोशी यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले आहे. दिवसाढवळ्या हरितपट्ट्यावर अतिक्रमण सुरू असताना संबंधित प्रभागातील अधिकाऱ्यांना ते का दिसत नाही? जर प्रशासनाने यावर त्वरित कारवाई केली नाही, तर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, असा सवाल तक्रारदारांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.