

तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मोरबे धरणातील जलसाठ्यात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे समोर आले आहे. सध्या धरणात केवळ ६१.१३५ एमसीएम पाणीसाठा शिल्लक असून, हा साठा १६ ऑगस्टपर्यंत पुरेल, असा अंदाज महापालिका प्रशासनाचे उपअभियंता संतोष उणावणे यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या तोंडावर धरणातील पाणीसाठा घटत असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत ही घट अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणातील साठा तुलनेने अधिक होता. त्यामुळे यंदाची परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेची ठरत आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून, उपलब्ध साठ्यावर ताण निर्माण झाला आहे. त्यात पनवेल परिसरात पाण्याची चोरी होत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचा ६१.१३५ एमसीएम साठा योग्य नियोजन आणि काटकसरीने वापरल्यास ऑगस्टपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येऊ शकतो. मात्र, पावसाळा उशिरा सुरू झाल्यास किंवा अपेक्षित प्रमाणात पर्जन्य न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पाणी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जात आहे. शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच, मोरबे धरणातील घटता जलसाठा हा नवी मुंबईसाठी इशारा मानला जात असून, प्रशासनासोबतच नागरिकांनीही पाणी बचतीसाठी सक्रिय भूमिका घेणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे.
कारवाईसाठी पोलिसांना पत्र
एकीकडे पनवेल तालुक्यातील देवद आणि विंचुबे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या मोरबे जलवाहिनीतून दररोज तब्बल एक लाख युनिट पाणी अनधिकृतपणे उपसले जात असल्याचा दावा नगरसेवक गवस यांच्याकडून करण्यात आला आहे. या ठिकाणी केवळ १,८०० युनिटपर्यंत पाणी वापरण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत भगदाड पाडून पाणी चोरले जात आहे. या पाणीचोरीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने खांदेश्वर पोलिसांना पत्रदेखील दिले आहे.
एल निनोचा परिणाम
यंदा मॉन्सून सरासरीच्या केवळ ९४ टक्के राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यात एल निनोमुळे माॅन्सूनचे वारे कमकुवत होऊन पावसावर थेट परिणाम होऊन जूनमध्ये तुलनेने स्थिर राहील, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते.