

उलवे, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची चाचणी घेण्यासाठी आपत्कालीन मॉक ड्रिल घेण्यात आले. या सरावात चक्रीवादळ परिस्थितीचे अनुकरण करून विविध यंत्रणांनी समन्वयाने आपत्कालीन प्रतिसाद कसा दिला जातो, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये सिडको, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, अग्निशामक दल, आग व बचाव सेवा, तसेच वैद्यकीय सेवांमध्ये महाराष्ट्र सरकारची राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा, अपोलो हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल, स्वदेश फाउंडेशन आणि व्हाइट लोटस हॉस्पिटल यांचा सहभाग होता.
आपत्कालीन परिस्थितीत तत्पर प्रतिसाद देण्यासाठी विमानतळावरील विमानतळ आपत्कालीन अग्निशमन सेवा (एआरएफएफ) पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. क्रॅश फायर टेंडर (सीएफटी) सारख्या अत्याधुनिक वाहनांच्या सहाय्याने विमान आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद प्रतिसाद कसा दिला जातो, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. उच्च क्षमतेच्या पाणी, फोम आणि ड्राय केमिकल प्रणालींचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचे कौशल्य दाखवण्यात आले.
घटनास्थळी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता, जिथून संपूर्ण मोहिमेचे नियंत्रण, संवाद आणि विविध यंत्रणांमधील समन्वय साधला जात होता. बचावकार्यादरम्यान एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर पथकांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक केले. ७० मीटर उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या हायड्रॉलिक यंत्रणेच्या साह्याने उंच इमारतींवरील बचावकार्य प्रभावीपणे पार पाडले गेले.
श्वानाची मदत
अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाने प्रशिक्षित श्वानाची मदत घेतली. श्वानांच्या सहाय्याने अचूक ठिकाणाची पाहणी केल्यानंतर हायड्रॉलिक कटर, स्प्रेडर आणि बचाव आऱ्यांसारख्या साधनांनी अडथळे दूर करून बचाव पथकाने आत प्रवेश केला आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. या मॉक ड्रिलमध्ये महिलांचाही उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला. एका महिला जवानाने दोरीच्या साह्याने उंच ठिकाणाहून लहान बाळाचे यशस्वी सुटका करून दाखवली.
आपत्कालीन स्थलांतरण प्रक्रियेचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रवाशांना सुरक्षित आणि जलद बाहेर काढण्यासाठी समन्वयित पद्धतीने जमिनीवरील सहाय्य प्रणाली कशा कार्यरत होतात, हे दाखवण्यात आले. या संपूर्ण सरावातून विविध यंत्रणांमधील समन्वय, तत्परता आणि तांत्रिक कौशल्यांची प्रभावी चाचणी झाली. भविष्यातील कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी विमानतळ प्रशासन आणि संबंधित यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास आहे.
- दीपक तिवारी, कमांडर, एनडीआरएफ पथक