

एमआयडीसीतील गटारकामांचा बोजवारा
तांत्रिक चुकांमुळे नागरिकांच्या खिशातून भुर्दंड
डोंबिवली, ता. ९ : एमआयडीसी निवासी विभागात कोट्यवधी रुपये खर्चून सुरू असलेल्या नवीन गटारे आणि नाल्यांच्या बांधकामात गंभीर तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. ठेकेदाराकडून अभियांत्रिकी निकषांना हरताळ फासला जात असून, या सदोष कामामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होण्याऐवजी साचण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून सुरक्षा उपाययोजना कराव्या लागत आहेत.
मिलापनगर आणि परिसरातील रहिवाशांनी या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, एमआयडीसी प्रशासनाकडून पारदर्शकतेची मागणी केली आहे. पावसाळी पाण्याचा प्रवाह आणि जमिनीचा उतार लक्षात न घेता अनेक ठिकाणी गटारे वेडीवाकडी बांधण्यात आली आहेत. काही ठिकाणी गटारांची खोली आणि रुंदी यात मोठी तफावत आहे. गटारावरील काँक्रीट स्लॅबवर पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेली छिद्रे चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहेत. यामुळे पाणी गटारात जाण्याऐवजी रस्त्यावरच साचण्याची शक्यता आहे.
अपघाताचे निमंत्रण
ही उघडी छिद्रे पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहेत. प्रशासनाने दखल न घेतल्याने काही रहिवाशांनी स्वतःच्या खर्चाने यावर स्टीलच्या जाळ्या बसवल्या आहेत. गटारावरील स्लॅबची पातळी रस्त्यापेक्षा उंच ठेवल्याने घरांसमोर आणि रस्त्यावर पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पारदर्शकतेची मागणी
वारंवार तक्रारी करूनही एमआयडीसीचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. हे काम अधिकृत आराखड्यानुसार सुरू आहे का, हे तपासण्यासाठी प्रशासनाने मूळ नकाशे नागरिकांसमोर उपलब्ध करून द्यावेत. जनतेचा पैसा अशा निकृष्ट कामावर वाया जाऊ नये, अशी प्रतिक्रिया समाजसेवक राजू नलावडे यांनी दिली.