संघटना मजबुतीसाठी शिवसेनेने कसली कंबर

संघटना मजबुतीसाठी शिवसेनेने कसली कंबर
Published on

शिंदे गटाची संघटनात्मक मोर्चेबांधणी
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी घेतला त्रिसदस्यीय आढावा
ठाणे, ता. ९ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी मैदानात उतरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची बुधवारी मॅरेथॉन बैठक घेऊन मार्गदर्शन केले. पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून प्रत्येक बूथ सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

मुंबईतील दोन दिवसांच्या बैठकीनंतर खासदार शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या संपर्क प्रमुखांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांशी समन्वय वाढवून पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

मतदार नोंदणी मोहीम
मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. एकही पात्र मतदार यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी बूथनिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या क्षेत्रातील मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांची माहिती अद्ययावत ठेवावी, अशा सूचना खासदार शिंदे यांनी दिल्या.

चर्चेला पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेत मोठे संघटनात्मक बदल होणार किंवा ''भाकरी फिरणार'' अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या; मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडी पक्षात सुरू नसून, या केवळ माध्यमांमधील अटकळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com