

दहिसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती
भौतिक कामे अंतिम टप्प्यात
मुंबई, ता. ९ : उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांमुळे २४६ कोटींचा दहिसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पाची भौतिक कामे जवळपास पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
मे २०२४मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पीयूष गोयल यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण आढावा बैठका तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या नियमित पाठपुराव्यामुळे ही प्रगती साध्य झाली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सांडपाणी अडवणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि नदीचा प्रवाह स्वच्छ व निरोगी बनवणे हा आहे. या प्रकल्पांतर्गत दहिसर नदीकिनारी अत्याधुनिक मेम्ब्रेन बायोरिॲक्टर तंत्रज्ञानावर आधारित दोन पूर्णतः स्वयंचलित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यापैकी एक इंदिरानगर येथे ५.० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि दुसरा सुकुरवाडी येथे १.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. दोन्ही सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमधील सिव्हिल व यांत्रिक कामे १०० टक्के पूर्ण झाली असून, सध्या कमिशनिंग आणि हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांतून शुद्ध केलेले पाणी बागकाम, रस्ते स्वच्छता आणि इतर महापालिका वापरासाठी (पेयजल नसलेल्या वापरासाठी) केले जाणार असून, शाश्वत जल व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.
दहिसर नदी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसी तलावापासून मनोरी खाडीपर्यंत १२ किमीपर्यंत पसरलेली आहे. ती वर्षानुवर्षे शहरी अतिक्रमण आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे हळूहळू प्रदूषित होत गेली. २६ जुलै २००५च्या मुंबई पुरानंतर माधव चितळे समितीने शहरातील प्रमुख नद्यांच्या सुधारणा आणि पुनरुज्जीवनाची शिफारस केली होती. यामध्ये दहिसर नदीचा समावेश होता. त्यानुसार महापालिकेच्या ब्रिमस्टोवॅड योजनेअंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला. याचा उद्देश सांडपाणी अडवणे, अपशिष्ट जलाचे शुद्धीकरण करणे आणि पूरक नागरी पायाभूत सुविधांद्वारे नदीचा प्रवाह सुधारणे हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून प्रेरित आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या पाठबळामुळे दहिसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्प स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत विकासासाठी आमची बांधिलकी दर्शवितो. हा उपक्रम केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण, जल व्यवस्थापन मजबूत करणे आणि उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती पुनर्स्थापित करण्याचे कार्य करतो, असे खासदार पीयूष गोय यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.