कचरा प्रकल्प एसआरएच्या मुळावर

कचरा प्रकल्प एसआरएच्या मुळावर
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : नवी मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येत असणारा कचऱ्यातून ऊर्जानिर्मितीच्या प्रकल्पामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना अडचणीत आली आहे. हा प्रकल्प रहिवासी इमारतींजवळ झाल्यास नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होईल. त्यामुळे एसआरए प्रकल्पात कोणी राहायला जाणार नाही. त्यापेक्षा हा प्रकल्प या परिसरातून दुसरीकडे स्थलांतरित करा, अशी भूमिका तुर्भे येथील झोपडपट्टीतील रहिवाशांनी घेतली आहे.

तुर्भे येथे महापालिकेची कचराभूमी आहे. गेले अनेक वर्षे सुरू झालेल्या या कचराभूमीतील तीन टप्पे संपून गेले आहेत. आता चौथ्या टप्प्यातील कामदेखील शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी कचराभूमीसाठी असणारी जागा संपलेली आहे. या जागेवर कचऱ्याचे महाकाय डोंगर उभे राहत आहेत. आता या कचरा पूर्णपणे उपसा करून त्या जागेवर नव्याने कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प नवी मुंबई महापालिकेला करायचा आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, सुमारे २०० कोटींचा हा ठेका आहे. एमआयडीसीने झोपडपट्टी पुनर्वसनाकरिता काढलेल्या निविदेमुळे नवी मुंबईत रान पेटले आहे.

अगदी विटावापासून ते बेलापूरदरम्यान सुमारे ३५ हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाची निविदा एमआयडीसीने काढली आहे. या निविदेत त्रुटी असल्याने सांगून माघार घेण्यात आल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले, तरी शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून एसआरए योजनेकरिता बैठकांचा धडाका लावून जोरदार तयारी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई महापालिकेने काढलेला ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प या सर्व एसआरएच्या प्रकल्पांना अडचणीत आणणारा आहे. प्रशासनाने वेळीच हा प्रकल्प मागे न घेतल्यास रास्ता रोको करत आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांना दिला आहे.

उच्च न्यायालयात जाणार
नवी मुंबई महापालिकेतर्फे वारंवार झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांवर अन्याय केला जातो. शहरात राहणारे नागरिक स्वतःच्या घराजवळ कचरा प्रकल्प येऊ देतील काय, मग झोपडपट्टीतील लोकांनीच दुर्गंधी का सहन करायची, असा प्रश्न उपस्थित करत हा प्रकल्प आमच्या एसआरए प्रकल्पाच्या मुळावर असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर महापालिकेने प्रकल्प थांबवला नाही, तर उच्च न्यायालयात जाण्याची तयारी असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी दिली.

वेगवेगळा न्याय का?
कोपरखैरणे येथे नवी मुंबई महापालिकेचा जुना कचरा प्रकल्प बंद करून त्या जागेवर निसर्ग उद्यान साकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महापालिकेने तुर्भे येथील कचराभूमी बंद करून त्या जागेवर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाऐवजी सुंदर उद्यान उभारावे. शहरी भागात आणि झोपडपट्टीत वेगळा न्याय का, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com