

ऑटो रिक्षाचालकांचे आंदोलन
नवी मुंबईत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, सक्तीच्या नोंदणीविरोधात संताप
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांमध्ये वाढत चाललेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने चालक सहभागी झाले होते. ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना सर्वपक्षीय कृती समितीतर्फे हे आंदोलन छेडण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळा’च्या सक्तीच्या सदस्य नोंदणीविरोधात संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. संघटनांच्या म्हणण्यानुसार, १६ मार्च २०२४ला कोणतीही व्यापक चर्चा न करता मंडळाची स्थापना करण्यात आली. सदस्य नोंदणीसाठी ५०० रुपये आणि वार्षिक ३०० रुपये शुल्क आकारण्यात येत असून, त्याबदल्यात कोणत्या सुविधा मिळणार याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप करण्यात आला.
संघटनांनी यापूर्वी २३ मार्च २०२६ला निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे सांगितले. तसेच काही ठिकाणी सदस्यत्वाशिवाय रिक्षा पासिंगसारखी कामे केली जात नसल्याने चालकांमध्ये नाराजी वाढली आहे. आंदोलनादरम्यान सक्तीची नोंदणी तत्काळ थांबवावी, शुल्क रद्द करावे आणि संघटनांशी चर्चा करून धोरण जाहीर करावे, या मागण्या करण्यात आल्या.
उपप्रादेशिक कार्यालयामार्फत सक्तीची नोंदणी केली जात असल्याने आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मात्र अधिकाऱ्यांनी यापुढे सक्ती होणार नसल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले, असे एकवीरा रिक्षाचालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले.
कोट
आंदोलनाचे निवेदन आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. उपप्रादेशिक कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारची सक्तीची नोंदणी केली जात नाही.
- दत्ता सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
चौकट
सक्तीच्या नोंदणीवरून संघर्ष तीव्र
संघटनांनी इशारा दिला आहे, की शासनाने लवकरात लवकर स्पष्ट धोरण जाहीर करून शुल्क रद्द केले नाही, तर राज्यभर व्यापक आंदोलन छेडले जाईल. चालकांच्या उपजीविकेवर परिणाम करणाऱ्या निर्णयांविरोधात एकवटून लढा देण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.