

विकसकाविरोधात गुन्हा
इमारत बांधकामाचे बनवले बोगस प्रमाणपत्र
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : कोपरखैरणे येथील बोनकोडे भागात महापालिकेचे बनावट ‘बांधकाम प्रमाणपत्र’ (सीसी) तयार करून इमारत उभी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाहनवाज सरफराज खान असे या विकसकाचे नाव आहे. त्याने ही इमारत अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी बनावट बांधकाम प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केल्यानंतर त्याची बनावटगिरी उघडकीस आली आहे. या विकसकाविरोधात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात सरकारी दस्तऐवजांचे बनावटीकरण करणे तसेच बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून त्याचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरखैरणे सेक्टर १२ डी, बोनकोडे येथील आकाश सागर अपार्टमेंट (प्लॉट क्र. २१, हिस्सा क्र. १२) ही इमारत विकसक शाहनवाज सरफराज खान याने बांधली आहे. या इमारतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक दिवाळखोरी याचिका प्रलंबित होती. या सुनावणीदरम्यान संबंधित इमारतीच्या अधिकृततेचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे विकसक शाहनवाज खान याने ही इमारत अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी ११ ऑगस्ट २०१०मध्ये नवी मुंबई महापालिकेचे बनावट बांधकाम प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते.
त्यानंतर उच्च न्यायालयाने या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाने विकसक शाहनवाज खान याने उच्च न्यायालयात सादर केलेल्या बांधकाम प्रमाणपत्राची आपल्या कार्यालयात असलेल्या मूळ कागदपत्रांशी तुलना केली. त्यानंतर विकसकाने सादर केलेल्या प्रमाणपत्राचा जावक क्रमांक आणि महापालिकेच्या रेकॉर्डमधील क्रमांक यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे आढळले. प्रत्यक्षात त्या तारखेला महापालिकेने असे कोणतेही प्रमाणपत्र निर्गमितच केले नसल्याचे स्पष्ट झाले.
विकसक शाहनवाज खान याने बनावट बांधकाम प्रमाणपत्र (सीसी) तयार करून त्याचा वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांत वापर करून शासन आणि महापालिकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिकेच्या नगररचना विभागाला दिले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेचे उपअभियंता संतोष चौधरी यांनी याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विकसक शाहनवाज सर्फराज खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काही कर्मचाऱ्यांचा हात?
महापालिकेच्या नावाचे हुबेहूब बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या वापरून ही फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास कोपरखैरणे पोलिस करीत असून, या रॅकेटमध्ये महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांचा हात आहे का किंवा अशाच प्रकारे इतर काही विकसकांनी बनावट प्रमाणपत्रे तयार केली आहेत का याचा शोध पोलिस घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.