लोकअदालतीतून ३१ संसार पुन्हा जुळले

लोकअदालतीतून ३१ संसार पुन्हा जुळले
Published on

लोकअदालतीतून ३१ संसार पुन्हा जुळले
रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, व्यसनाधीनता, आर्थिक अडचणी, संशय, संवादाचा अभाव आणि शारिरिक व मानसिक छळ यांसारख्या विविध कारणांमुळे सध्या विवाहित जोडप्यांमध्ये कलह वाढताना दिसत आहे. किरकोळ वादातून सुरू झालेले मतभेद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करून थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. अशा परिस्थितीत तुटण्याच्या मार्गावर असलेल्या संसारांना वाचविण्यासाठी रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लोकअदालतीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. मार्च २०२५ ते २०२६ या वर्षांत लोकअदालतीच्या माध्यमातून ३१ संसार पुन्हा जुळले आहेत.
या वर्षात लोकअदालती घेऊन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ३१ जोडप्यांचे संसार पुन्हा सुरळीत करण्यात जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाला यश आले आहे. मागील वर्षभरात झालेल्या पाच लोकअदालतींमध्ये तीन हजार ७०१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने मार्च २०२६ ते २०२६ या कालावधीमध्ये लोकअदालतींमधून तुटणाऱ्या संसाराची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नी हे संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. यातील एक जरी चाक अविश्वास, संशय किंवा वादविवादाच्या गाळात रुतले, तर संपूर्ण संसाराचा गाडा अडखळतो. छोट्या-छोट्या गैरसमजांतून निर्माण झालेले वाद, सुसंवादाच्या अभावामुळे वाद वाढत जातात आणि संसार घटस्फोटापर्यंत पोहोचतात. घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या पती-पत्नींची प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येतात. यामध्ये समुपदेशन, संवाद आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून ३१ पती-पत्नींमधील दुरावा दूर करण्यात यश आले. यामुळे दोन्ही कुटुंबांचे भवितव्यही वाचले आहे.

लोकअदालतीतील वर्षभराचा तपशील :
१. २२ मार्च २०२५- ६७२ प्रकरणे- ४ संसार जुळले
२. १० मे २०२५ - ६७४ प्रकरणे - ५ संसार जुळले
३. १३ सप्टेंबर २०२५ - १,०५१ प्रकरणे - ५ संसार जुळले
४. १३ डिसेंबर २०२५ - ७०५ प्रकरणे - ११ संसार जुळले
५. १४ मार्च २०२६ - ५९९ प्रकरणे - ६ संसार जुळले
एकूण तीन हजार ७०१ प्रकरणे - ३१ संसार पुन्हा एकत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com