

मुरबाड, ता. १० (बातमीदार) : पावसाळा जवळ येऊ लागल्याने मुरबाड तालुक्यातील गृहिणींची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. वाल, हरभरा, मूग, चवळी, मटकी आदी विविध कडधान्यांचा साठा करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यात पावसाळी भातशेतीनंतर कडधान्यांची पेरणी केली जाते. सध्या या पिकांची काढणी सुरू असून काही शेतकरी हरभरा व वाल विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये नव्या कडधान्यांची आवक वाढली आहे.
पावसाळ्यात, विशेषतः श्रावण महिन्यात कडधान्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्या काळात बाजारात जाण्यापेक्षा उन्हाळ्यातच कडधान्ये खरेदी करून कडक उन्हात वाळवून साठवून ठेवण्याची गृहिणींची परंपरागत पद्धत आहे. यामुळे घरगुती साठा तयार होतो आणि पावसाळ्यातील गैरसोयी टाळता येतात. एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर कडधान्य खरेदी होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात हरभरा ११० ते १३० रुपये किलो, वाल १५० ते १८० रुपये किलो, मूग १०० ते १२० रुपये किलो, तर चवळी सुमारे १५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
मुरबाड तालुक्यात पूर्वी कडधान्य शेती मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, मोकाट गुरांच्या त्रासामुळे गेल्या काही वर्षांत या शेतीला मर्यादा आल्या होत्या. सध्या ग्रामीण भागात गुरांची संख्या कमी होत असून, कडधान्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा या पिकांकडे वळू लागले आहेत. यामुळे स्थानिक उत्पादनातही वाढ होत असल्याचे दिसून येते.
कडधान्याचे दर (प्रति किलो, रुपयांत)
हरभरा ... ११० ते १३०
वाल ... १५० ते १८०
मूग ... १०० ते १२०
चवळी ... १५०
मुरबाड : पावसाळ्याच्या बेगमीसाठी गृहिणींनी हरभरे, वाल उन्हामध्ये वाळविण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.