जल जीवन मिशन योजनेचे तीनतेरा वाजल्याने महिलांच्या माथी हंडा

जल जीवन मिशन योजनेचे तीनतेरा वाजल्याने महिलांच्या माथी हंडा
Published on

शेखाडी गावात पाणीटंचाईचे चटके
हर घर जल घोषणेनंतरही महिलांच्या माथी हंडा
श्रीवर्धन, ता. १० (वार्ताहर) ः तालुक्यातील शेखाडी गावात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. हर घर जल आणि जलजीवन मिशनसारख्या योजना राबवूनही, एप्रिल महिन्यापासूनच गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, पुन्हा महिलांच्या डोक्यावर हंडे दिसू लागले आहेत. यामुळे शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील १२५० लोकसंख्या असलेल्या शेखाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १२८ ग्राहकांना नळजोडणी देण्यात आली आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे दररोज किमान ५५ लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे अपेक्षित असते. साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत जलजीवन मिशन योजनेच्या विहिरीला जलस्रोतात अडथळा येत नसल्याने दोन्ही जलसाठा टाक्या योग्य क्षमतेने भरल्या जातात, परंतु एप्रिल महिना उजाडताच काही दिवसांतच शाश्वत जलस्रोताचे प्रमाण घटत असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
शेखाडी मुळगाव, समर्थ वाडी आणि मोहल्ला या परिसरात शेखाडी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पंचायत समितीमार्फत स्वमालकीच्या विहिरीत टॅंकरद्वारे दहा हजार लिटर पाणीपुरवठा केला जात आहे.

समृद्ध पंचायत राजमध्येच टॅंकरने पाणीपुरवठा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवित शिक्षण, स्वच्छता आणि प्रशासकीय कामात शेखाडी ग्रामपंचायतीने प्रगती केली आहे. ग्रामस्थांनी लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांसारखी जलसंधारणाची कामेही केली. स्वदेश ड्रीम व्हिलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेखाडीमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने आता शासन कोणत्या ठोस उपाययोजना आखणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

शेखाडी येथे दरवर्षी मार्च महिनादरम्यान पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात होते ती जून महिन्याच्या अखेरपर्यंत असते. जलजीवन मिशन योजनेच्या विहिरीतील झरे उष्णतेच्या दिवसात आटतात. पाणीटंचाई समस्या कायमची दूर व्हावी यासाठी शासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात याव्यात व आम्हाला नवीन जलजीवन मिशन योजना देण्यात यावी.
- बबन पाटील, सरपंच, शेखाडी ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com