नवी मुंबई होणार फेरीवालामुक्त!

नवी मुंबई होणार फेरीवालामुक्त!
Published on

वाशी, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील रस्ते व पदपथ फेरीवालामुक्त करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून, प्रत्येक विभागात नियमित कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. नेरूळ, बेलापूर, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, तसेच ऐरोली परिसरातील अनेक पदपथ फेरीवालामुक्त करण्यात महापालिकेला यश मिळाले आहे. सातत्याने सुरू असलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

शहरात वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विभागनिहाय विशेष मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, एका प्रभागातील अतिक्रमण पथक दुसऱ्या प्रभागात पाठवून संयुक्त कारवाई केली जात असल्याने मोहिमेला अधिक गती मिळत आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे आणि उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग अधिकारी रस्ते, पदपथ व मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करत आहेत. ठाणे-बेलापूर मार्ग तसेच शिळ-महापे रस्त्यावरही फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

स्थानक परिसरातील रस्ते मोकळे
नेरूळ व सानपाडा रेल्वे स्थानक परिसरासह विविध भागातील आठवडा बाजारांवरही कारवाई करण्यात येत आहे. सततच्या कारवाईमुळे अनेक अनधिकृत फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय बंद केला असून, स्थानक परिसरातील रस्ते आता मोकळे दिसू लागले आहेत.

रात्रीही कारवाई सुरूच
फेरीवाल्यांची संख्या आणि त्यांचे व्यवसायाचे वेळापत्रक लक्षात घेऊन महापालिकेने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार सकाळ, दुपार आणि रात्री अशा तिन्ही सत्रांत कारवाई केली जात आहे. त्यामुळे मोहिमेचा प्रभाव अधिक व्यापक होत आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम शहरात दिसू लागला असून, रस्ते व पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांना ये-जा करताना होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांत नियमित कारवाई सुरू आहे. अतिक्रमण पथकांना विविध प्रभागांत पाठवून प्रभावीपणे मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे कारवाई अधिक यशस्वी ठरत आहे.
- डॉ. कैलास गायकवाड, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com