

पनवेल, ता. १० (बातमीदार) : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांसह महत्त्वाच्या प्रशासकीय विषयांना मंजुरी देण्यात आली. ही सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेला स्थायी समिती सदस्यांसह परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, स्वरूप खारगे, मुख्य लेखाधिकारी नीलेश नलावडे, कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे, उपसचिव अक्षय कदम तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. सभेत शहरातील सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी व ग्राफिटी करण्याच्या कामास मंजुरी देताना संबंधित कंत्राटदाराच्या देयकातून २० टक्के कपात करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. तसेच महापालिकेतील संगणक, नेटवर्क व इतर आयटी यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामालाही हिरवा कंदील देण्यात आला.
भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागांपैकी सात जागांवर चर्चा करण्यात येऊन त्यातील चार आवश्यक जागांना भाडेपट्टा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोयनावेळे व घोट गावांना जोडणाऱ्या तळोजा नदीवरील पुलाच्या बांधकामास तसेच गाढी नदीवरील नवीन पुलाच्या उभारणीस मंजुरी देण्यात आली. करवले गावातील पायाभूत सुविधा उर्वरित काम पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त १११ मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासही मंजुरी देण्यात आली.
तळोजा सेक्टर-७ येथे शाळा उभारणार
नवीन पनवेलमधील पोदी सेक्टर-१६ येथील खराब झालेल्या फुटपाथच्या दुरुस्तीचा विषयही मंजूर करण्यात आला. खारघर सेक्टर-१४ येथे प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळोजा सेक्टर-७ येथे महापालिका शाळा उभारण्यालाही समितीने मान्यता दिली. स्थायी समितीत सादर होणाऱ्या विषयांची माहिती पुढील सभांमध्ये सादरीकरणाद्वारे देण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
पालिकेच्या हद्दीत नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही ठोस आणि दीर्घकालीन विकासकामांना प्राधान्य देत आहोत. आजच्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आलेले पूल, शाळा, पायाभूत सुविधा व देखभाल विषयक निर्णय हे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कामांमध्ये पारदर्शकता राखत गुणवत्ता अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिकता असून, कंत्राटदारांवरही त्यासाठी आवश्यक ते बंधन घालण्यात येत आहे.
- बबन मुकादम, सभापती, स्थायी समिती, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.