अमली पदार्थांची विक्री करणारी दुकली गजाआड

अमली पदार्थांची विक्री करणारी दुकली गजाआड
Published on

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : नेरूळ रेल्वे स्थानकालगत असलेल्या भंगार दुकानातून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. राजू बाबू राठोड (वय ३८) आणि अरमान खालीद खान (३०) यांच्याकडून दोन लाख १६ हजारांचे ७.२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या तस्करी प्रकरणात सहभागी असलेल्या इतर तीन संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

नेरूळ रेल्वे स्थानक, सेक्टर २८ मधील पब्लिक ब्रीजच्या शेजारी असलेल्या झोपडीत काही व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने गुरुवारी (ता. ९) सकाळी ७.३० वाजता नेरूळ रेल्वे स्थानकालगतच्या झोपडीवर छापा टाकला. या वेळी राजू आणि अरमान हे संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे हेरॉईन, तसेच रिकाम्या कागदी चिठ्ठ्या आणि ॲल्युमिनियम फॉइलच्या पट्ट्या सापडल्या. या दोघांविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करीत इमरान, कमलाबाई राठोड व गंगा काळे या तिघांचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com