

रेल्वे मार्गातील नैसर्गिक नाले माती भरावामुळे बंद
माती भरावामुळे वसईला पुराचा धोका?
विरार ता. १० (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गासह वसईत रेल्वे यार्ड नव्याने तयार केले जात आहे. कामादरम्यान मोठ्या प्रमाणात माती भराव करताना पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बुजविले जात आहे, असा आरोप करत स्थानिक लोक प्रतिनिधींनी वसईत पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, पावसापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात केलेला माती भराव हा काढून टाकू, असा दावा ही दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने केला आहे.
नायगाव आणि वसई या दोन स्थानकाच्या दरम्यान उमेलमान परिसर आहे. त्याच ठिकाणी रेल्वेचे यार्ड तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशात येथील माती भरावादरम्यान नैसर्गिक नाले बुजविले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या तक्रारीनंतर बुधवारी रेल्वेचे प्रकल्प व्यवस्थापक, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेवक प्रकाश रॉड्रिक्स, नगरसेवक आशीष वर्तक व तेथील स्थानिकांनी एकत्रित पाहणी केली. यादरम्यान, रेल्वेने मुख्य प्रवाहाचे जे नाले आहेत, ते बुजविले असल्याचा आरोप या वेळी नागरिकांनी केला. रेल्वे यार्डच्या कामाला आमचा विरोध नाही, परंतु जे नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग आहेत, ते खुले राहिले पाहिजेत. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
=====================================
स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या पाणी तुंबण्याच्या भीतीवर रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रकल्पाच्या कामामुळे कोणत्याही नैसर्गिक नाल्याचा मार्ग रोखला जागार नाही, त्याउलट या भागात नाल्यांचा आकार वाढवून तो ३-३ मीटर करण्यात येत आहे. नाल्याची रुंदी पूर्वीपेक्षा दुप्पट असणार आहे. याशिवाय कामासाठी नाल्यांमध्ये तात्पुरते पाइप आणि माती टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. हा सर्व भराव १५ मेपर्यंत पूर्णपणे काढून नाल्यांचा प्रवाह मोकळा केला जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक आनंद कुलकर्णी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.