

कर्जतमध्ये दुभाजक बसवण्यास सुरुवात
लेन शिस्तीमुळे कोंडी कमी होण्याची अपेक्षा; बचाव समितीच्या पाठपुराव्याला यश
कर्जत, ता. १० (बातमीदार) : कर्जत तालुक्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार फाटा परिसरातील वाहतूक कोंडीवर अखेर उपाययोजना सुरू करण्यात आली असून, काँक्रीट दुभाजक बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येकडे लक्ष वेधत कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने ॲड. कैलास मोरे यांनी फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. त्यामध्ये चार फाट्यापासून चौकाच्या दिशेने काँक्रीट डिव्हायडर बसवण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत पोलिस विभागाने संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत तातडीने काम सुरू केले.
सध्या चार फाटा ते प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या गेटपर्यंत दुभाजक बसवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या दुभाजकामुळे वाहनचालकांकडून होणारे लेन उल्लंघन कमी होऊन वाहतूक अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे. परिणामी, वाहतूक कोंडीचा ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीच चार फाटा ते नानासाहेब धर्माधिकारी कमानीपर्यंतच्या मार्गावर फायबर स्टंप स्वरूपातील डिव्हायडर बसवण्यात आले असून, त्याचाच पुढचा टप्पा म्हणून काँक्रीट दुभाजक उभारण्यात येत आहेत. कर्जत शहर बचाव समितीने शहरातील विविध समस्यांवर सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या मागणीला मिळालेले यश नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
चौकट
अरुंद पूल कायम डोकेदुखी
चार फाटा परिसरातील अरुंद रेल्वे पूल आणि श्रीराम पुलावर एकाच मार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप कायम आहे. नवीन पुलाचे काम सुरू असले तरी तोपर्यंत डिव्हायडरची उभारणी ही तात्पुरती उपाययोजना ठरत असून, कायमस्वरूपी तोडगा म्हणून नवीन पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.