

खालापूर-वणवे रस्त्याची दुरवस्था
निधीअभावी अर्धवट काम; १२ वर्षे दुरुस्तीचा अभाव
खालापूर, ता. १० (बातमीदार) : खालापूर नगर पंचायत हद्दीतील वणवे-निंबोडे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, गेल्या १२ वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे सुमारे दोन किलोमीटर अंतराचा हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
वणवे व निंबोडे या गावांतून जाणारा हा महत्त्वाचा रस्ता पुढे सावरोली-खारपाडा राज्यमार्गाला जोडला जातो. २०१४ मध्ये तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता अल्पावधीतच खराब झाला.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी निंबोडे ते वणवे गावाच्या काही भागापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, परंतु उर्वरित अर्धा टप्पा निधीअभावी रखडलेला आहे. हा रस्ता अद्याप नगर पंचायतीकडे वर्ग न झाल्याने नगर पंचायतीला त्यावर खर्च करता येत नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे.
खेडोपाडी काँक्रीटचे रस्ते होत असताना तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता मात्र दयनीय अवस्थेत असल्याने वणवे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोट :
रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असून, आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडेही पाठपुरावा सुरू आहे.
- किशोर पवार, उपनगराध्यक्ष
चौकट :
निधीअभावाची टीका
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खालापूर विश्रामगृहावर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना, केवळ दोन किलोमीटर रस्ता पूर्ण करण्यासाठी निधी नसल्याची बाब खेदजनक असल्याची टीका होत आहे. याबाबत विभागाचे अभियंता अक्षय किंजळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
चौकट
रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांचा धोका वाढत असून, संबंधित विभागाने निधी उपलब्ध करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांकडून जोरदार मागणी होत आहे.
फोटो- रस्त्याची झालेली दुरवस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.